Showing posts with label देशकाल. Show all posts
Showing posts with label देशकाल. Show all posts

Tuesday, November 24, 2015

दहशतवाद्यापेक्षा अधिक घातक

दहशतवाद्यापेक्षा अधिक घातक 

कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली वाहताना या देशातील प्रत्येक घटक त्यांच्याप्रमाणेच आपआपल्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावतोय का हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारला पहिजे. कारण आजूबाजूला बघितल्यानंतर तरी तसे वाटत नाही. काही दिवस आपण हळहळ व्यक्त करतो आणि येरे माझ्या मागल्या सुरु करतो.  पाश्चात्य देशात जितकी मानवी जीवनाची किमत आहे तितकी आपल्याकडे का  नाही. आपण बलिदानाचे सोहळे साजरे करतो. पण त्यातून अशी बलिदाने थांबणार नाहीत. जिकडे तिकडे टक्केवारी आणि कट यांचेच अस्तित्व आहे. आपल्याला स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही दिसत नाहि. असे कुणी हुतात्मा झाले कि समाज माध्यमांवर देशप्रेमाचा पूर येतो. आणि नंतर विसरून जातो. आपले कट आणि टक्केवारी, चिरीमिरी यामध्ये मश्गुल होऊन जातो. महाडिकासारखे बलिदान झाले कि देशप्रेमाने भारावून जातो आपली गिल्ट कॉन्शस  दूर करण्यासाठी अशा घटनांचा आपण वापर करतो हा गिल्ट  कशामुळे यतो याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरन. याआधी फेसबुक वर प्रसिद्ध झाले आहे पण महाडिकांच्या बलिदानाच्या निमित्ताने पुन्हा ईथे देत आहे. 

गुरुवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास पाचजण मोरवाडीत (पिंपरी) येथील श्रद्धा हेरिटेज या इमारतीत घुसले. होंडा अॅसेंट कारमधून आलेल्या या पाचजणांनी पहिल्यांदा वाॅचमनला चाकुचा धाक दाखवून शांत केले. पुढच्या दहा मिनिटात त्यांनी इमारतीतील दोन सदनिका फोडल्या. तिसरी सदनिका फोडत असताना कटावणीचा आवाज झाल्याने समोरच्या सदनिकेतले लोक जागे झाले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून एका जबाबदार नागरिकाने पोलिसांना 100 नंबरवर काॅल केला. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले होते. ते घरात गेल्यानंतर बाहेरून लाॅक करायचे, तो पर्यंत पोलिस येतील. असा रहिवाशांचा कयास होता.
पण कशाचं काय काही तरी चमत्कार झाला आणि चोरटे अर्धवट फोडलेला फ्लॅट तसाच सोडून खाली उतरले आणि गाडी घेऊन पसार झाले. काही वेळातच नाईट पॅट्रोलचे मार्शल तिथे दाखल झाले. रहिवाशांनी चोरट्यांची गाडी आताच गेल्याचे सांगितले. पण मार्शलनी अथवा त्यानंतर आलेल्या पोलिसांनी पाठलाग करण्यामध्ये फारसे स्वारस्य दाखवले नाही. दोनच दिवसापूर्वी त्याच सोसायटीत दूसर्या इमारतीत पाच सदनिका फोडल्या होत्या.100 नंबर वर फोन जाणं, चोरट्यानी त्यांची मोहीम अर्धवट सोडून पळून जाणं. आणि त्यानंतर पोलिसांचं घटनास्थळी दाखल होणं यामध्ये काही परस्परसंबंध असावा काय? घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणारयांचं तरी तसं मत बनलंय. एका पूर्वानुभवावरून मलाही वाटतं की शंका घ्यायला जागा आहे. एक पत्रकार मित्र रेजिल मेनन यांनी पोलिस आणि गुन्हेगारांची अशीच लिंक एस्टाब्लीश केली होती. पुणे स्टेशन वरील तीन पत्तीच्या जुगारा विरोधात कंट्रोल ला काॅल गेला की असाच चमत्कार व्हायचा. कंट्रोलला काॅल गेल्यानंतर यातल्या मुख्य माणसाला काॅल येतो. याचे व्हिडीओ रेकाॅर्डिंगही केले होते. काळे धंदेवाल्याकडून, बेकायदा वाहतूकदारांकडून, उशीरा सुरू असणार्या हाॅटेल आणि बार मालकांकडून पोलिस हप्ते घेतात असे ऐकले होते. आपल्या देशात पोलिसाला पाहिले की लोकांना सुरक्षित वाटण्याऐवजी उलट भितीच वाटते याची हीच कारणे असावीत बहुधा.
पण थेट चोरांशी हातमिळवणी ही अतिशय अस्वस्थ करणारी बाब आहे. उद्या त्यांनी अतिरेक्यांशी हातमिळवणी केली तर किंवा सीमेवरच्या सैनिकांनी शत्रूशी हातमिळवणी केली तर, या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. आम्हा सगळ्यांनाच स्वार्थाने इतकं अंध केलेय का की ज्यामुळे कुठे थांबायचं हे आम्हाला कळतच नाही? तत्काल स्वार्थ आपल्याला इतके महत्वाचे झालेत की समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून आपण आपण सेल्फ डिस्ट्रक्शन मोडवर चाललो आहोत याचं भानच राहू नये?
हे सरकारचे अपयश आहे. जवाब दे मोदी सरकार असे कुठल्याही छोट्यामोठ्या घटनेबद्दल आपण वारंवार ऐकतो. पण असली राजकीय सवंगता आपल्या समाजजीवनात खोलवर रुजलेल्या अपप्रवृत्ती उखडून फेकू शकणार नाही. त्यासाठी गंभीर शस्त्रक्रिया कराव्या लागतील. ती कुणा पक्षाची किंवा सरकाची जबाबदारी नाही. सगळ्यांना सामुहिकपणे हा राक्षस गाडला पाहिजे. पण प्रश्न असा आहे की त्यासाठी आपली मानसिक तयारी, किमान परिस्थितीचे गांभीर्य आम्हा लोकांना आहे का?

Thursday, October 22, 2015

रविशकुमारकडे कोण लक्ष देणार?


एखाद्याला आपले म्हणणे पटत नसले की आपण जसे वडीलधाऱ्या माणसांनासमाजातील प्रतिष्ठांना मध्यस्थ म्हणून घेतो  त्यांना शब्द टाकायला सांगतोतो त्याच्यावर  एक प्रकारचा नैतिक दबाव असतो. आणि एवढा मोठा माणूस सांगतोय म्हणजे ते खरेच असावे म्हणून कदाचित त्याला ते पटण्याची शक्यता आहे. आपले कदाचित चुकलेच असावे असा अपराधगंड तयार होतोअसे करून आपण आपले म्हणने खरे करून घेत असतो.   पुरस्कार वापसी हा त्यातलाच प्रकार आहे. जे लोकांच्या मनातून उतरले आहेत त्यांनी आपले म्हणणे जनतेच्या गळी उतरवण्यासाठी साहित्यिक विचारवंतांचे नैतिक बळ पणाला लावले आहे. जसे महाभारतात दूर्योधनाने भिष्म, द्रोण आदी रथी महारथींना युद्धात उतरवले होते, तसाच हा प्रकार  आहे. दूर्योधन ही आपला हेका सोडून आत्मपरिक्षण करायला तयार नव्हता आणि हे रथी महारथीही त्यांच्या उपकारात किंवा वचनात बांधले असल्याने त्याच्या चुका सांगायला तयार नव्हते. तशीच परिस्थिती आजच्या वैचारिक रथी महारथींची झाली आहे.

कोणताही विचार केवळ तो  चांगला आहे म्हणून समाजात टीकू आणि वाढू शकत नाही. त्यासाठी पूरक परिस्थिती त्या असावी लागते. त्या समाजातील लेखक आणि विचारवंत जे प्रतिपादन करतात त्याची सत्यता लोकांना तेव्हाच पटते जेव्हा त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष वास्तवात येतो. त्यामुळेच सैद्धांतिक पातळीवर विचार कितीही तर्कशुद्ध असला तरी त्याच्या उलट परिस्थिती समाजात असेल तर लोक त्या विचाराला रिजेक्ट करतात आणि दूसरा विचार स्वीकारतातही प्रक्रिया दीर्घकालीन आणि हळूहळू होत जाते. कोणताही विचार हा परिस्थितीतून जन्माला येतो. विचार मांडणाऱ्याचा हेतू प्रामाणिकच असतो, पण पुढे त्या विचारांच्या नावाखाली लबाडी करुन स्वार्थ साधण्याचा धंदा सुरू होतो. त्यामुळे तो विचार बदनाम होत जातो. त्यामुळे विचारांना पुढे घेऊन जाणार्यामध्ये नैतिकता आणि निष्ठा असावा लागते बोलणाऱ्यांवर लोक तेव्हाच विश्वास ठेवतात तेव्हा त्याच्या वागण्या बोलण्यात सुसंगती असते. 


  स्वतःचा व्यवसाय असणारा आणि दूसऱ्याकडे नोकरी करणारा माणूस  यांची त्या व्यवसायासाठी आत्मियता त्याला यशस्वी करण्यासाठीची धडपड यात नक्कीच काहीतरी गुणात्मक फरक असतो. नोकराचा पगाराशी मतलब असतोत्यामुळे त्याचा केवळ दिवस भरण्याकडे कल असतो. तर ज्याचा व्यवसाय असतो तो व्यवसाय यशस्वी करण्यासाठी  रात्रंदिवस एक करत असतो.  एखादा प्रश्न जेव्हा माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न होतो तेव्हा त्या प्रश्नासाठी तो आपली सगळी ताकद पणाला लावतो. आणि त्या कामाशी तो एकरूप होऊन जातो. विद्यापीठीय चर्चा, सेमिनार आणि शोधनिबंध यात व्यस्त असणारा वर्ग तोंडाने कितीही शोषितांचे प्रश्न मांडत असला तरी तो प्रस्थापित झालेला आहे. परिवर्तन हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न राहिलेला नाही. सरकारी पदावर वर्णी लावण्यासाठी लॉबींग करणेविविध लाभ पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत राहणे. परकिय निधी असलेल्या प्रकल्पांवर काम करणे अशा कामात गुंतलेल्या माणसांचे मस्त चाललेले असते.  आणि हे लोक ज्यांचा विचार मांडतात त्यांचे हाल मात्र कुत्रे खात नाही.  यांच्या डोळ्यादेखत शेतकरी उध्वस्त झाला, कामगार देशोधडीला लागला, शहरे बकाल झाली यातल्या कोणत्याही प्रश्नापेक्षा त्यांना कुठलेतरी भलतेच प्रश्न महत्त्वाचे वाटू लागले आणि वर्षानुवर्षे त्याचीच पारायणे सुरू आहेत. परिस्थितीनुसार बदलण्याची लवचिकता त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच प्रगतीवादी कमालीचे स्थितीवादी  झाले आहेत. या उलट सामान्य जनता  आपले प्रश्न सोडवण्यासाठी वाट्टेल ती तडजोड करायला तयार आहे.  

गेल्या विधानसभा निवडणुकीत एका प्रमुख राजकीय पक्षाच्या  नेत्याने खासगीत बोलताना व्यक्त केलेले मत  खुप काही सांगून जाणारे आहे.  एका मतदारसंघात झोपडपट्टीची लोकसंख्या जास्त असल्याचा फायदा किंवा तोटा कुणाला होईल असे विचारल्यावर तो नेता म्हणाला जी मते पैसे देवून विकत घेता येतात त्यांचा फारसा विचार करायची गरज नसते. याचाच अर्थ  तो पक्ष पुरोगामी की प्रतिगामी हा मुद्दा गैरलागू झालेला आहे.  सामान्य जनताच नाही तर राजकीय नेतृत्वही अनेकदी तडजोड करते. मायावतीचा  बहुजन समाज पक्ष, कश्मीर मध्ये आधी नॅशनल कॉन्फरन्स आणि आता पीडीपी, तसेच अनेक राज्यामध्ये दलित नेत्यानी भाजपाशी केलेली तडजोड हा व्यवहारवाद आहे.  हा व्यवहारवाद वैचारीक बांधिलकीवर मात करताना दिसतो. सामान्य  जनता आणि सक्रिय राजकारणी  लवचिक आहेत. पण विचारांशी बांधिलकी माननारे लोक जुन्याच सिद्धांतांना चिकटून राहिले आहेत. लोकशाहीच्या सत्तर वर्षात आपला देश थोडा तरी पुढे सरकला आहे. हे लक्षात न घेता तीच तीच पारायणे करत राहिल्याने लोक त्यापासून दूरावले आहेत.


पुरस्कार वापसीवर उमटलेल्या विरोधी सूरामध्ये ज्येष्ठ कन्नड लेखक एस. एल  भैरप्पा , प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन आणि प्रसिद्ध टीव्ही पत्रकार रविशकुमार ही प्रमुख नावे आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांनीही पुरस्कार वापसीवर  टीका करत या साहित्यिकांनाच आरोपिच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणी लोकांच्या टीका राजकीय म्हणून गांभिर्याने घेता येत नाही. तस्लिमाचे लेखन बांग्लादेशातल्या मुस्लिम जमातवादाच्या विरोधात असल्याने हिंदूत्ववाद्यांना तिच्याविषयी विशेष आपुलकी आहे. तसेच भारतातल्या मुस्लिम जमातवाद्यानी तिला लक्ष्य केले होते तेव्हा सगळे विचारस्वातंत्र्य वाले सेक्युलर सुप्तावस्थेत गेले होते म्हणून तस्लिमाचा राग असू शकतो. भैरप्पा हे अशी उघड राजकीय भूमिका घेणारे म्हणून प्रसिद्ध नाहीत म्हणून ते आताच का बोलले म्हणून त्यांच्याकडेही दूर्लक्ष करता येईल. पण रविश कुमार जे काही बोलले त्याकडे दूर्लक्ष करता येणार नाही. कारण एकतर अतिशय संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून त्यांना सगळा देश ओळखतो. दिल्लीतल्या इतर पत्रकारावर एखाद्याची तळी उचलण्याचा जसा आरोप होतो तसा  रविशकुमारवर होत नाही. आणि विशेष म्हणजे रविशकुमार शंभर टक्के  धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी मूल्य मानणारा असल्यामुळे तो पुरोगाम्यांचा गळ्यातील ताईत आहे.   त्यामुळेच तो काय म्हणतो हे लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे.  रविशकुमार म्हणाला, आपल्या उदारमतवादी  कमालीचे संधीसाधू आणि आळशी झाले आहेत. कॉंग्रेस राजवटीत यांच्यापैकी अनेकांना सरकारी संस्थावर संचालक म्हणून नेमण्यात आले. पण सरकार गेले तरी ते संचालकांच्या भूमिकेतून बाहेर यायला तयार नाहीत. या उलट वाजपेयी सरकार मध्ये आरएसएसच्या ज्या लोकांना सरकारी पदे मिळाल्यानंतर जेव्हा हे सरकार गेले तेव्हा पुन्हा त्यांनी स्वतःला संघाच्या कामात वाहून घेतले. हा वर्क कल्चरचा फरक आहे.

रविशकुमारची तरी संघी म्हणून हेटाळणी करता येणार नाही कारण SCROLL च्या त्याच मुलाखतीत  आणि इतरत्रही तो भाजपप्रणीत केंद्र सरकारवर कठोर टीका करत असतो. म्हणूनच रविशकुमार काय म्हणतो ते गांभिर्याने घेण्याची गरज आहे. पण मस्त चाललंय आमचं, या मानसिक स्थितीतून बाहेर येऊन रविशकुमार म्हणतो तसे लेगवर्क करण्याची तयारी किती जणांची आहे  हा प्रश्नच आहे.

Tuesday, October 13, 2015

राडेबाजी.. आणि कावेबाजी..



पाकीस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाच्या मुंबईतील प्रकाशन सोहळ्याला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकल्याने  आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. शिवसेनेच्या प्रतिक्रियावादी राजकारणाचा देशातले बुद्धिवादी आपल्या नेहमीच्या शैलीत समाचार घेत आहेत. शिवसेनाच नाही तर देशातल्या इतर अनेक संघटनामध्ये अशा राडेबाज कार्यकर्त्यांचा भरणा आहे. त्यांची   मानसिकता नेमकी काय असते  आणि हा कार्पयकर्ता कसा तयार कसा याचा थोडाही  विचार आपल्याकडे  होताना दिसत नाही. त्यामुळे देशातले वैचारिक विश्व आणि प्रत्यक्ष कृतीशील कार्यकर्ता यांचात शेकडो कोस अंतर पडले आहे. त्यामुळे विचारवंत बोलत असलेली  भाषा कृतीशील कार्यकर्त्यांना परग्रहावरची वाटू लागली आहे. खरेतर लोकशाहीप्रेमीं बुद्धीवाद्यांनी अशा राडेबाज  संघटनांना कार्यकर्त्यांची रसद मिळू नये  यासाठी व्यापक प्रबोधन मोहीम हाती घ्यायला पाहिजे होती. त्यांची सतत हेटाळणी करून त्यांच्यात झुंडीची मानसिकता वाढवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांना  विश्वासात घेऊन त्याचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास  वाढावा असे कार्यक्रम आखायला हवे होते. पण प्रत्यक्षात यापैकी काहीही करण्यात या विचारवंतांना कोणताही रस असल्याचे दिसत नाही. उलट या राडेबाजांनी असेच राडे घालावेत याची वाट बघत हे लोक जणू दबा धरुन बसले असल्या सारखे वाटतात. या राडेबाज संघटनानी नेमाने काही  करावे आणि विचारवंतांनी त्याच्यावर तुटून पडावे हे आता देशाच्या अंगवळणी पडले आहे. जर या राडेबाजांनी खूप दिवस काहीच केले नाही तर या विचारवंतांना कदाचित चुकल्या चुकल्यासारखे वाटत असावे.  त्यामुळेच ते अधून मधून त्यांना चिथावतही असतात.

 समाजाचे वैचारीक नेतृत्त्व करणाचा दावा करणाऱ्यांनी खरे तर सामाजिक सलोखा वाढीस लागावा, कार्यकर्ता प्रगल्भ व्हावा अशी मांडणी करणे अपेक्षित असते. समाजात काही चुकीच्या धारणा रुजल्या असतील तर त्याबद्दल संयत मांडणी करून प्रबोधन करणे हे लोकशाही  मजबूत करणारे ठरले असते. पण तसे होण्याऐवजी बऱ्यापैकी जनाधार मिळवलेल्या प्रस्थापित पक्षसंघटनांना चिथावणी देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांची हेटाळणी करून त्यांना कायदा हातात घ्यायला भाग पाडणे, त्यातून  त्यांची व्यापक बदनामी होईल आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या जनतेच्या मनात त्यांच्याविषयी घृणा निर्माण होईल अशी एकंदरीत व्युहरचना दिसते. पण त्याला कुठलेही यश आलेले नाही.  उलट या चिथावणीतून या संघटना अशा  विचारवंतांना विशिष्ट धर्माच्या, देशाच्या,  अतिरेकी  संघटनांचे एजंट म्हणून घोषित करतात आणि  त्यांच्या विषयी हेट कॅंम्पेन राबवतात. आणि त्यातून असे राडेबाज कार्यकर्ते निर्माण होतात.  एकदा त्यांच्या हेतू विषयी शंका निर्माण झाली की विचारवंतांचा विचार फक्त त्याच्या ठराविक कंपूपर्यंत मर्यादित राहतो. त्याला लोकांचा पाठींबा मिळत नाही आणि त्यांची मांडणी आणि समाजाच्या धारणा यात अंतर पडत जाते.

 काही एनजीओ जशी वर्तमानपत्रांची कात्रणे जमा करून खूप काम झाल्याचा आभास निर्माण करतात आणि निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करतात तसाच प्रकार वैचारीक क्षेत्रात सुरू आहे. हे लोक ही असाच आभास  निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र परिणाम शुन्य असतो. कसूरी प्रकरणातही कुलकर्णी यांना पाकचे एजंट ठरवण्यात आले आहे. आणि घटनेनंतर कुलकर्णी यांनी जो काय सवंग प्रकार केला त्यावरून त्यांनाही माध्यमांचा वापर करून मोठा इम्पॅक्ट झाल्याचा अभास निर्माण करायचा होता असे दिसते.
   
समाजामध्ये सर्वबाजूनी विचार करण्याची क्षमता असणारे लोक संख्येने खूप कमी असतात. बहुतांश लोक फास्टफूडसारखी तयार मांडणी स्वीकारून  आपली मते बनवत असतात. असे लोक जगाकडे ब्लॅक अॅण्ड व्हाईट या रंगातच पाहतात. त्यांची स्वपक्ष आणि शत्रूपक्ष अशी सरळ विभागणी असते. त्यांच्यासमोर कोणताही  तर्क चालत नाही.  खरे तर असे सरळ ब्लॅक अॅण्ड व्हाईट असत नाही थोडा फार ग्रे एरीया पण असतो.  पाकीस्तानच्या बाबतीत तो कमी असेल पण असेल निश्चित. त्यालाही संधी द्यायला काय हरकत आहे.  वाजपेयी यांनी ही संधी दिली होती. पण त्यावेळी  शांती वार्ता सुरू असताना कारगिल घडले होते. तरीही सर्व पर्याय खुले ठेवूनही शांती प्रयास सुरू ठेवणे आवश्यक असते. पण हे समजणारा प्रगल्भ समाज निर्माण करण्यासाठी मूळापासून आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. पण ते न करता देशातल्या अनेक विचारवंतांनी  स्वीकारलेल्या राजकीय  तडका असलेल्या शार्टकटमूळे परिस्थिती अधिकच चिघळू शकते. मात्र ती चिघळावी हाच हेतू असेल, आणि तसा प्रयास करणाऱ्या विघातक शक्तींना विचारवंत आपला खांदा वापरायला देत असतील आणि त्यांना पुरक  मांडणी होत असेल तर ती या राडेबाजीपेक्षा भयंकर ठरेल..