आग सोमेश्वरी बम्ब रामेश्वरी
आंदोलनात छापल्या जाणाऱ्या घोषणा, चित्रे, फोटो यांची योजना अतिशय विचारपूर्वक टार्गेट ऑडियन्सला भावनिक आवाहन करतील अशी आहे. जी काही आपली आजची परिस्थिती आहे त्याला संपूर्णपणे कुणीतरी दुसराच जबाबदार आहे. योग्यता असताना आपल्यावर प्रचंड अन्याय होत आहे. अशी भावना वाढीस लावणारी जातीय अहंगंड सुखावणारी आहेत. आपण इतिहास घडवणारे लोक अतिशय दुर्लक्षित झालो आहोत.आता हीच वेळ आहे आपली ताकद दाखवण्याची अशी झुंडीची आक्रमक मानसिकता तयार करणारी आहेत.आपले सगळे प्रश्न आरक्षण मिळाल्यावर किंवा ऍट्रोसिटी रद्द झाल्यावर सुटणार आहेत अशा प्रकारचा भ्रम निर्माण करून दिला जात आहे. हे सगळे उत्स्फूर्तपणे होत असेल असे वाटत नाही.
आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण काही करू शकत नाही. याला जबाबदार असलेल्याच घटकांनी ते सरकार असेल किंवा इतर समाजगटांनीच आता काही तरी केले पाहिजे, अशी पराभूत मानसिकता घडवली जात आहे. आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल आपण थोडे आत्मपरीक्षण करू. कोण चुकलंय हे पाहण्यापेक्षा काय चुकलंय याचा शोध घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू हा समजुतीचा सूर कुठे दिसत नाही. सरकारवर अवलंबून न राहता समाजातल्या गरिबांना मदत करण्यासाठी समांतर व्यवस्था निर्माण करणारे काही समाज आहेत. त्यांचे काम अनुकरणीय आहे. पुण्यात जैन समाजाच्या मुलांसाठी समाजाचे वसतिगृह आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची अल्प दरात राहण्या खाण्याची सोय तिथे केली जाते. बहुसंख्ये असलेल्या जातींनी या दिशेने कधी विचार केला नाही. समाजातल्या गरजूंची संख्या खूप आहे आणि ते सगळेच्या सगळे सरकारी व्यवस्थेवर अवलंबून असतात. तिथे जागा मिळवण्यासाठी स्पर्धा करतात आणि नाही मिळाले कि निराश होतात.
मराठा असो किवा पटेल समाज असो सरकारवर फारसे अवलंबून न राहता समाजाच्या गरिब विद्यार्थ्यांसाठी मोठ्या शहरामध्ये वसतिगृहाचे जाळे उभे करण्याची क्षमता या समाजातल्या धनिकांमध्ये नक्कीच आहे. मोर्च्यात सहभागी होणाऱ्या महागड्या गाड्या याची साक्ष देतील. आत्महत्या कराव्या लागणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी समाज निधी उभा करू शकतो. नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनी जसे काम उभे केले तसे काम जिल्ह्या जिल्ह्यात उभे करता येऊ शकते. त्यासाठी समाजाकडे उपलब्ध असणारी साधन सामग्री आणि पैसा वापरता येईल. पण त्यासाठी कष्ट आहेत. त्यासाठी रचनात्मक विचार करण्याची सवय असली पाहिजे. एक दिवस मोर्च्यात जाऊन आपले जातीप्रती कर्तव्य निभावल्याचे जे समाधान मिळते तसे स्वस्त समाधान अशी कामे करून मिळणार नाही.
प्रत्येकाला शॉर्टकट पाहिजे आहे,जादूच्या कांडी फिरल्यासारखे प्रश्न एका दिवसात सुटायला हवे आहेत. पण दूरचे कुणालाच बघायचे आहे असे वाटत नाही. सगळ्याच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या, आरक्षण मिळाले, ऍट्रोसिटी प्रतिबंधक कायदा रद्द झाला. तरी प्रश्न शिल्लक राहणार आहेत. कारण आरक्षण आणि कायदा आमच्या दुखण्याचे कारण नाही. पण हे स्पष्टपणे कुणीही सांगत नाही. कारण तसे सांगणे कुणाच्याच सोयीचे नाही. योग्य निदान करून योग्य उपचार करण्याची गरज असताना. आग सोमेश्वरी आणि बम्ब रामेश्वरी अशी एकंदर स्थिती होऊन बसली आहे. हे मृगजळामागे धावणे होते हे लोकांना कधीतरी कळेल पण त्यावेळी कदाचित वेळ निघून गेलेली असेल.