Thursday, October 22, 2015

रविशकुमारकडे कोण लक्ष देणार?


एखाद्याला आपले म्हणणे पटत नसले की आपण जसे वडीलधाऱ्या माणसांनासमाजातील प्रतिष्ठांना मध्यस्थ म्हणून घेतो  त्यांना शब्द टाकायला सांगतोतो त्याच्यावर  एक प्रकारचा नैतिक दबाव असतो. आणि एवढा मोठा माणूस सांगतोय म्हणजे ते खरेच असावे म्हणून कदाचित त्याला ते पटण्याची शक्यता आहे. आपले कदाचित चुकलेच असावे असा अपराधगंड तयार होतोअसे करून आपण आपले म्हणने खरे करून घेत असतो.   पुरस्कार वापसी हा त्यातलाच प्रकार आहे. जे लोकांच्या मनातून उतरले आहेत त्यांनी आपले म्हणणे जनतेच्या गळी उतरवण्यासाठी साहित्यिक विचारवंतांचे नैतिक बळ पणाला लावले आहे. जसे महाभारतात दूर्योधनाने भिष्म, द्रोण आदी रथी महारथींना युद्धात उतरवले होते, तसाच हा प्रकार  आहे. दूर्योधन ही आपला हेका सोडून आत्मपरिक्षण करायला तयार नव्हता आणि हे रथी महारथीही त्यांच्या उपकारात किंवा वचनात बांधले असल्याने त्याच्या चुका सांगायला तयार नव्हते. तशीच परिस्थिती आजच्या वैचारिक रथी महारथींची झाली आहे.

कोणताही विचार केवळ तो  चांगला आहे म्हणून समाजात टीकू आणि वाढू शकत नाही. त्यासाठी पूरक परिस्थिती त्या असावी लागते. त्या समाजातील लेखक आणि विचारवंत जे प्रतिपादन करतात त्याची सत्यता लोकांना तेव्हाच पटते जेव्हा त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष वास्तवात येतो. त्यामुळेच सैद्धांतिक पातळीवर विचार कितीही तर्कशुद्ध असला तरी त्याच्या उलट परिस्थिती समाजात असेल तर लोक त्या विचाराला रिजेक्ट करतात आणि दूसरा विचार स्वीकारतातही प्रक्रिया दीर्घकालीन आणि हळूहळू होत जाते. कोणताही विचार हा परिस्थितीतून जन्माला येतो. विचार मांडणाऱ्याचा हेतू प्रामाणिकच असतो, पण पुढे त्या विचारांच्या नावाखाली लबाडी करुन स्वार्थ साधण्याचा धंदा सुरू होतो. त्यामुळे तो विचार बदनाम होत जातो. त्यामुळे विचारांना पुढे घेऊन जाणार्यामध्ये नैतिकता आणि निष्ठा असावा लागते बोलणाऱ्यांवर लोक तेव्हाच विश्वास ठेवतात तेव्हा त्याच्या वागण्या बोलण्यात सुसंगती असते. 


  स्वतःचा व्यवसाय असणारा आणि दूसऱ्याकडे नोकरी करणारा माणूस  यांची त्या व्यवसायासाठी आत्मियता त्याला यशस्वी करण्यासाठीची धडपड यात नक्कीच काहीतरी गुणात्मक फरक असतो. नोकराचा पगाराशी मतलब असतोत्यामुळे त्याचा केवळ दिवस भरण्याकडे कल असतो. तर ज्याचा व्यवसाय असतो तो व्यवसाय यशस्वी करण्यासाठी  रात्रंदिवस एक करत असतो.  एखादा प्रश्न जेव्हा माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न होतो तेव्हा त्या प्रश्नासाठी तो आपली सगळी ताकद पणाला लावतो. आणि त्या कामाशी तो एकरूप होऊन जातो. विद्यापीठीय चर्चा, सेमिनार आणि शोधनिबंध यात व्यस्त असणारा वर्ग तोंडाने कितीही शोषितांचे प्रश्न मांडत असला तरी तो प्रस्थापित झालेला आहे. परिवर्तन हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न राहिलेला नाही. सरकारी पदावर वर्णी लावण्यासाठी लॉबींग करणेविविध लाभ पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत राहणे. परकिय निधी असलेल्या प्रकल्पांवर काम करणे अशा कामात गुंतलेल्या माणसांचे मस्त चाललेले असते.  आणि हे लोक ज्यांचा विचार मांडतात त्यांचे हाल मात्र कुत्रे खात नाही.  यांच्या डोळ्यादेखत शेतकरी उध्वस्त झाला, कामगार देशोधडीला लागला, शहरे बकाल झाली यातल्या कोणत्याही प्रश्नापेक्षा त्यांना कुठलेतरी भलतेच प्रश्न महत्त्वाचे वाटू लागले आणि वर्षानुवर्षे त्याचीच पारायणे सुरू आहेत. परिस्थितीनुसार बदलण्याची लवचिकता त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच प्रगतीवादी कमालीचे स्थितीवादी  झाले आहेत. या उलट सामान्य जनता  आपले प्रश्न सोडवण्यासाठी वाट्टेल ती तडजोड करायला तयार आहे.  

गेल्या विधानसभा निवडणुकीत एका प्रमुख राजकीय पक्षाच्या  नेत्याने खासगीत बोलताना व्यक्त केलेले मत  खुप काही सांगून जाणारे आहे.  एका मतदारसंघात झोपडपट्टीची लोकसंख्या जास्त असल्याचा फायदा किंवा तोटा कुणाला होईल असे विचारल्यावर तो नेता म्हणाला जी मते पैसे देवून विकत घेता येतात त्यांचा फारसा विचार करायची गरज नसते. याचाच अर्थ  तो पक्ष पुरोगामी की प्रतिगामी हा मुद्दा गैरलागू झालेला आहे.  सामान्य जनताच नाही तर राजकीय नेतृत्वही अनेकदी तडजोड करते. मायावतीचा  बहुजन समाज पक्ष, कश्मीर मध्ये आधी नॅशनल कॉन्फरन्स आणि आता पीडीपी, तसेच अनेक राज्यामध्ये दलित नेत्यानी भाजपाशी केलेली तडजोड हा व्यवहारवाद आहे.  हा व्यवहारवाद वैचारीक बांधिलकीवर मात करताना दिसतो. सामान्य  जनता आणि सक्रिय राजकारणी  लवचिक आहेत. पण विचारांशी बांधिलकी माननारे लोक जुन्याच सिद्धांतांना चिकटून राहिले आहेत. लोकशाहीच्या सत्तर वर्षात आपला देश थोडा तरी पुढे सरकला आहे. हे लक्षात न घेता तीच तीच पारायणे करत राहिल्याने लोक त्यापासून दूरावले आहेत.


पुरस्कार वापसीवर उमटलेल्या विरोधी सूरामध्ये ज्येष्ठ कन्नड लेखक एस. एल  भैरप्पा , प्रसिद्ध बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन आणि प्रसिद्ध टीव्ही पत्रकार रविशकुमार ही प्रमुख नावे आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांनीही पुरस्कार वापसीवर  टीका करत या साहित्यिकांनाच आरोपिच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणी लोकांच्या टीका राजकीय म्हणून गांभिर्याने घेता येत नाही. तस्लिमाचे लेखन बांग्लादेशातल्या मुस्लिम जमातवादाच्या विरोधात असल्याने हिंदूत्ववाद्यांना तिच्याविषयी विशेष आपुलकी आहे. तसेच भारतातल्या मुस्लिम जमातवाद्यानी तिला लक्ष्य केले होते तेव्हा सगळे विचारस्वातंत्र्य वाले सेक्युलर सुप्तावस्थेत गेले होते म्हणून तस्लिमाचा राग असू शकतो. भैरप्पा हे अशी उघड राजकीय भूमिका घेणारे म्हणून प्रसिद्ध नाहीत म्हणून ते आताच का बोलले म्हणून त्यांच्याकडेही दूर्लक्ष करता येईल. पण रविश कुमार जे काही बोलले त्याकडे दूर्लक्ष करता येणार नाही. कारण एकतर अतिशय संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून त्यांना सगळा देश ओळखतो. दिल्लीतल्या इतर पत्रकारावर एखाद्याची तळी उचलण्याचा जसा आरोप होतो तसा  रविशकुमारवर होत नाही. आणि विशेष म्हणजे रविशकुमार शंभर टक्के  धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी मूल्य मानणारा असल्यामुळे तो पुरोगाम्यांचा गळ्यातील ताईत आहे.   त्यामुळेच तो काय म्हणतो हे लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे.  रविशकुमार म्हणाला, आपल्या उदारमतवादी  कमालीचे संधीसाधू आणि आळशी झाले आहेत. कॉंग्रेस राजवटीत यांच्यापैकी अनेकांना सरकारी संस्थावर संचालक म्हणून नेमण्यात आले. पण सरकार गेले तरी ते संचालकांच्या भूमिकेतून बाहेर यायला तयार नाहीत. या उलट वाजपेयी सरकार मध्ये आरएसएसच्या ज्या लोकांना सरकारी पदे मिळाल्यानंतर जेव्हा हे सरकार गेले तेव्हा पुन्हा त्यांनी स्वतःला संघाच्या कामात वाहून घेतले. हा वर्क कल्चरचा फरक आहे.

रविशकुमारची तरी संघी म्हणून हेटाळणी करता येणार नाही कारण SCROLL च्या त्याच मुलाखतीत  आणि इतरत्रही तो भाजपप्रणीत केंद्र सरकारवर कठोर टीका करत असतो. म्हणूनच रविशकुमार काय म्हणतो ते गांभिर्याने घेण्याची गरज आहे. पण मस्त चाललंय आमचं, या मानसिक स्थितीतून बाहेर येऊन रविशकुमार म्हणतो तसे लेगवर्क करण्याची तयारी किती जणांची आहे  हा प्रश्नच आहे.

Sunday, October 18, 2015

हा तर रडीचा डाव

लहानपणी वाचलेली गोष्ट आठवते, एका माणसाला  कुणीतरी सिद्ध पुरूष भेटतो. तो सिद्घपुरूषाला  विचारतो मी कधी मरणार आहे.  सिद्ध पुरूष म्हणतो की जो जन्माला आलाय तो कधी तरी मरणारच . त्या माणसाचे समाधान या उत्तराने होत नाही. तो  म्हणतो की नाही मला हे कळलेच पाहिजे की मी कधी मरणार ते. त्याच्या दूराग्रहामूळे  साधूचा नाईलाज होतो, आणि वेळ मारून नेण्यासाठी तो त्याला एक ताबीज देतो. आणि सांगतो हा ताबीज जो पर्यंत आहे तो पर्यंत तू जिवंत, तूटला की तुझ्या आयुष्याची दोरही तुटली म्हणून समज.  त्या दिवसापासून  तो ताबीज खूप जपतो. आणि त्या ताबीजात त्याचा जीव आहे ही कल्पना त्याच्या मनाची जबरदस्त पकड घेते आणि तो त्याच भ्रमात जगत राहतो. कालांतराने ताबीजाचा दोरा जूना होतो आणि  तुटतो.  तो माणूस समजतो की ताबीज तुटलाय म्हणजे तो जीवंत नाही. लोक त्याला सांगतात की तू मेलेला नाहीस जीवंत आहेस, पण  तो  लोकांवर त्याचा विश्वास बसत नाही.  जगण्या मरण्याचे एक विज्ञान असते पण त्याला तो प्रतिकात्मक ताबीज  विज्ञानापेक्षा मोठा वाटत असतो. तो तुटलाय म्हणजे मी जीवंत असणे शक्य नाही  असे समजून स्वतःच कबर खोदतो आणि स्वतःच त्यात झोकून देतो.  गोष्टीचे तात्पर्य काय एखाद्या माणसाच्या मनावर एखादी गोष्ट कोरली की त्याची एक वेगळीच मानसिक अवस्था तयार होते आणि त्यावर काही ईलाज नसतो.

अशीच काहीशी अवस्था आपल्या देशातल्या  लेखक आणि विचारवंतांच्या एका मोठ्या गटाची झाली आहे असे त्यांच्या अलिकडच्या वागण्यावरून वाटते.  त्यांच्यादृष्टीने कॉंग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा एकमेव पाठीराखा होता कॉंग्रेस सत्तेवर नसणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा  विचार (धर्म) बूडाला अशी त्यांची समजूत झाली आहे. कारण त्या माणसाला जसे ताबीजाचे महत्त्व होते तसेच यांना तोंडदेखले धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांचे. मग कॉंग्रेसप्रणीत सरकारांच्या सगळ्याच कृती त्यांच्यासाठी  आपोआप धर्मनिरपेक्ष होऊन जातात. त्यामुळे हा ताबीज  तुटला म्हणजे त्यांनी  आयुष्यभर जपलेली मूल्ये कायमची संपली असे त्यांना वाटू लागलेय.  याच भयाने त्यांना खूप आधीपासून ग्रासले आहे. नरेंद्र  मोदी सत्तेवर येईल तो देशासाठी काळा दिवस असेल अशी विधाने करून त्यांच्यापैकी काहींनी आधीपासूनच आपल्या पराभूत आणि भयभित मानसिकतेचे दर्शन घडवायला सुरुवात केली होती.  त्यांच्या अशा वागण्यांने  मोदीं आणि त्यांच्या पक्षाचा मार्ग सोपा करून ठेवला होता. असे करून त्यांनी  स्वतःच्या विचारांची कबर स्वतःच खणायला घेतली होती. त्यांना मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेपर्यंत जावू शकतो याची जाणीव सगळ्यांच्या आधी झाली होती. त्यामुळे गेल्या तेरा वर्षापासून सातत्याना आक्रस्ताळी मोदी विरोध सुरू होता. त्यामुळेच कोणाच्या ध्यानीमनी नसताना आपसुकच मोदी देशाच्या राजकारणात मध्यवर्ती स्थानी आले.

 मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात अमुक अमुक गोष्टी होणार असे त्यांच्या मनात पक्के ठसले होते. तशी नजर आधीच तयार असल्यामुळे त्यांनी त्या चिकित्सक नजरेतून घडामोडींकडे नव्याने पहायला सुरूवात केली. आधीच्या सरकारच्या काळात त्यांना तसे पाहण्याची आवश्यकता वाटत नव्हती. कारण त्यांच्या हातात धर्मनिरपेक्षता सुरक्षित होती  कारण धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत होते म्हणजे ताबीज सुरक्षित होता.  माणसाच्या मनाची ताकद जबरदस्त असते, मनात उभारी असेल आत्मविश्वास असतो आणि परिस्थितीशी सामना करण्याची धमक असते. पण उलट स्थिती असेल तर माणूस भयग्रस्त होतो. आणि भयभित होण्यासाठी कारणे शोधतो. त्यामुळेच  गेल्या दिड वर्षापासून या देशात अनेकांचा श्वास गुदमरायला लागला. कारण ताबीज तुटला की सगळं संपलं हे ठरलेलं होतं.  हे गुदमरलेपण जगजाहीर  करण्यासाठी त्यांना अनेक घटना घडत गेल्या. कारण सर्व धर्मांच्या आणि विचारांच्या अतिरेकी वृत्तीना आपल्या देशात फ्री हॅंन्ड देण्यात आला आहे. इतका की त्यांनी लोकशाही व्यवस्था हायजॅकच केली आहे. त्यामुळे त्यांच्यात सतत  टकराव सुरू आहे. त्यातून सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. पण प्रत्येकाला दूसऱ्याबाजूने झालेली हिंसा जितकी गंभीर वाटते तितकी आपल्या बाजूची वाटत नाही. त्यामुळेआपल्यावरच सगळ्यात जास्त अन्याय होतोय हे दाखवण्याची स्पर्धा लागली आहे. आणि तो अन्याय मोठा आणि अतिरंजीत करून सांगण्याची चढाओढ लागली आहे. त्यातून  अनेक ठिकाणी अन्यायाचा प्रतिकार म्हणून हिंसक घटनांचे  निर्लज्ज समर्थन होत असताना आपण पाहतो.

 विरोधी विचारांचे सरकार सत्तेत  असल्यावर असे प्रकार वाढावेत जेणेकरून त्याचे राजकारण करता येईल अशी गिधाडी वृत्ती आपल्या देशात खूप वाढली आहे. अशा  गिधाडांच्या सुदैवाने आणि देशाच्या दूर्दैवाने असे मुद्दे  सरकार पक्षाकडून आयतेच उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे  पराभूत झालेल्या राजकीय पक्षांनी सरकारविरोधी माहोल तयार करायला सुरूवात केली. पण ते  लोकांसमोर आधीच  उघडे पडल्याने त्यांच्या विश्वासार्हतेचा मोठाच प्रश्न होता. हवा तसा माहोल तयार होत नाही असे लक्षात आल्यानंतर   सरकारविरोधातला हा आवाज अॅम्फ्लिफाय करण्यासाठी  लेखक विचारवंतांना आखाड्यात ओढले गेले. . खरे तर अशाप्रकारे माहोल तयार करण्याचे  एक तंत्र आपल्या देशात विकसीत होत आहे. त्यामध्ये मानवी स्वभावाचा खुबीने वापर करण्यात येतो. सामान्य माणूस खोलात जावून विचार करत नाही, समाजातल्या मान्यवर लोकांच्या विचारानी तो प्रभावित होत असतो.  त्यामुळे विचारवंतानी  लोकप्रिय धारणेपेक्षा वेगळा सूर लावला की लोकांना आपलेच चुकलेच असे वाटण्याची शक्यता असते त्या गृहितकावर सध्याचे विचारवंतांचे बंड उभे राहिले आहे. पण आताच्या भारतीय समाजावर कुठल्याही विचारांचा कितपत प्रभाव आहे हा संशोधनाचा विषय आहे.

खरे तर जगाच्या  आणि देशाच्या इतिहासात अनेक लेखक आणि विचारवंत क्रांतीचे अग्रदूत ठरले होते. त्यांनी कुठला तरी विचार मांडावा आणि जनतेने तो उचलून धरावा आणि त्यांच्या मागे जावे अशी असंख्य उदाहरणे आहेत. पण आताची परिस्थिती वेगळी आहे, कोणताही विचाराची तितकी मोहिनी लोकांवर पडत नाही. वाचता येणाऱ्यांचे प्रमाण हजारो पटीने वाढले असतानाही ही परिस्थिती आहे हे विशेष. याचा अर्थ एक तर असा होतो की आजकालच्या विचारांमध्ये   जनतेला आकर्षित करण्याची ताकद नाही ताकद नाही किंवा जनताच कुचकामी आणि नालायक झाली आहे. तसे नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विचारवंत  आणि लोकशाही मूल्यांचे रखवालदार खडे  असताना. त्यांच्यामागे सर्वप्रकारची सरकारी  आर्थिक, ऱाजकीय, वैचारिक  ताकद उभी असताना जनतेने त्यांना हुलकावणी देत हुकुमशाही, जीर्णमतवादी, पुनुरूज्जीवनवादी, फॅसिस्ट लोकांचा पर्याय का निवडावा हा प्रश्नच आहे.  या प्रश्नाची प्रामाणिक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्याचा उलगडा होऊ शकतो पण त्यांना ती शोधण्यात काही स्वारस्य दिसत नाही. या बदलाचे एक कारण हे असू शकते की की लोकशाही मूल्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे  रखवालदार कुठल्यातरी दुसऱ्याच कामात गुंतलेले  होते  किंवा त्यांना डुलकी लागली होती. त्यावेळी त्यांच्या  फॅसिस्ट उंट त्यांच्या तंबूत घुसला.  त्यांना आलेली ही ग्लानी मान्य करून त्यांनी  खडबडून जागे झाले पाहिजे होते. आपल्या उध्वस्त तंबू परत उभा करण्यासाठी अगदी सुरूवातीपासून  जुळवाजुळव करायला पाहिजे होती. पण तसा कोणताही प्रयत्न करण्याऐवजी  उंटाच्या नावाने शिव्याशाप देण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. त्या बरोबरीने  उंटाच्या प्रेमात पडलेल्यांना नालायक ठरवण्याची यांना घाई झाली आहे.


 विचारवंतांच्या मूल्यनिष्ठा प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही, पण त्यांच्या या मूल्यनिष्ठांचा राजकारणाचा एक मोहरा म्हणून वापर होतोय. अशा वापरामूळे तात्पूरता माहोल तयार होईलही, पण त्यांना अभिप्रेत असलेली मूल्ये रूजवण्यासाठी त्याचा उपयोग होणार ऩाही. उलट विचारवंतांनी आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा (पुण्य)पणाला लागले आहे.  कारण कधी नव्हे एवढा विरोधाचा आणि टीकेचा सूर या बंडांच्याबाबतीत समाजातून उमटला आहे. विरोध सूरात बोलणाऱ्याना मोदी भक्त म्हणून हेटाळणी केल्याने मोदी भक्तांना काही फरक पडणार नाही. उलट मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी हे घडवून आणलेले बंड आहे या सरकाच्या आरोपांना पुष्टीच मिळेल. याचा सरकारवर आणि लोकांवर अपेक्षित परिणाम झाला नाही तर   सगळ्यात जास्त धक्का विचारवंतांच्या समाजातील प्रतिमेला बसणार आहे. कारण हे शस्त्र कायमचे निकामी होऊन जाणार आहे.

मूळात हिंदूत्ववादी सरकार सत्तेवर येणे हाच धर्मनिरपेक्षतेचा पराभव आहे असे  मानणे चुकीचे  आहे  आपल्या  विचारांना या देशात स्थान नाही असे मानून सैरभर होणे म्हणजे पराभूत आणि भयग्रस्त मानसिकतचे लक्षण आहे. हा पराभव विचारांचा नसून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत विचारांना  आपल्याला पाहिजे तसे वाकवून केलेल्या सत्तालोलूप राजकारणाचा, आणि लोकांना गृहित धरून त्यांच्याच आशाआकांक्षाचा बळी देणार्या वृत्तीचा आहे. मूळ समस्या दूर झाल्याशिवाय ग्लानीत गेलेल्या विचारांची पुनर्स्थापना होण्यासाठी हे बंड उपयुक्त ठरणार नाही. तस्लिमा नसरीनची भारतीय धर्मनिरपेक्षतेवरील टीप्पण्णी काय चुकलेय हे समजून घेण्यासाठी ऊपयुक्त ठरेल.  

Tuesday, October 13, 2015

राडेबाजी.. आणि कावेबाजी..



पाकीस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाच्या मुंबईतील प्रकाशन सोहळ्याला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकल्याने  आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. शिवसेनेच्या प्रतिक्रियावादी राजकारणाचा देशातले बुद्धिवादी आपल्या नेहमीच्या शैलीत समाचार घेत आहेत. शिवसेनाच नाही तर देशातल्या इतर अनेक संघटनामध्ये अशा राडेबाज कार्यकर्त्यांचा भरणा आहे. त्यांची   मानसिकता नेमकी काय असते  आणि हा कार्पयकर्ता कसा तयार कसा याचा थोडाही  विचार आपल्याकडे  होताना दिसत नाही. त्यामुळे देशातले वैचारिक विश्व आणि प्रत्यक्ष कृतीशील कार्यकर्ता यांचात शेकडो कोस अंतर पडले आहे. त्यामुळे विचारवंत बोलत असलेली  भाषा कृतीशील कार्यकर्त्यांना परग्रहावरची वाटू लागली आहे. खरेतर लोकशाहीप्रेमीं बुद्धीवाद्यांनी अशा राडेबाज  संघटनांना कार्यकर्त्यांची रसद मिळू नये  यासाठी व्यापक प्रबोधन मोहीम हाती घ्यायला पाहिजे होती. त्यांची सतत हेटाळणी करून त्यांच्यात झुंडीची मानसिकता वाढवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांना  विश्वासात घेऊन त्याचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास  वाढावा असे कार्यक्रम आखायला हवे होते. पण प्रत्यक्षात यापैकी काहीही करण्यात या विचारवंतांना कोणताही रस असल्याचे दिसत नाही. उलट या राडेबाजांनी असेच राडे घालावेत याची वाट बघत हे लोक जणू दबा धरुन बसले असल्या सारखे वाटतात. या राडेबाज संघटनानी नेमाने काही  करावे आणि विचारवंतांनी त्याच्यावर तुटून पडावे हे आता देशाच्या अंगवळणी पडले आहे. जर या राडेबाजांनी खूप दिवस काहीच केले नाही तर या विचारवंतांना कदाचित चुकल्या चुकल्यासारखे वाटत असावे.  त्यामुळेच ते अधून मधून त्यांना चिथावतही असतात.

 समाजाचे वैचारीक नेतृत्त्व करणाचा दावा करणाऱ्यांनी खरे तर सामाजिक सलोखा वाढीस लागावा, कार्यकर्ता प्रगल्भ व्हावा अशी मांडणी करणे अपेक्षित असते. समाजात काही चुकीच्या धारणा रुजल्या असतील तर त्याबद्दल संयत मांडणी करून प्रबोधन करणे हे लोकशाही  मजबूत करणारे ठरले असते. पण तसे होण्याऐवजी बऱ्यापैकी जनाधार मिळवलेल्या प्रस्थापित पक्षसंघटनांना चिथावणी देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांची हेटाळणी करून त्यांना कायदा हातात घ्यायला भाग पाडणे, त्यातून  त्यांची व्यापक बदनामी होईल आणि त्यांना पाठींबा देणाऱ्या जनतेच्या मनात त्यांच्याविषयी घृणा निर्माण होईल अशी एकंदरीत व्युहरचना दिसते. पण त्याला कुठलेही यश आलेले नाही.  उलट या चिथावणीतून या संघटना अशा  विचारवंतांना विशिष्ट धर्माच्या, देशाच्या,  अतिरेकी  संघटनांचे एजंट म्हणून घोषित करतात आणि  त्यांच्या विषयी हेट कॅंम्पेन राबवतात. आणि त्यातून असे राडेबाज कार्यकर्ते निर्माण होतात.  एकदा त्यांच्या हेतू विषयी शंका निर्माण झाली की विचारवंतांचा विचार फक्त त्याच्या ठराविक कंपूपर्यंत मर्यादित राहतो. त्याला लोकांचा पाठींबा मिळत नाही आणि त्यांची मांडणी आणि समाजाच्या धारणा यात अंतर पडत जाते.

 काही एनजीओ जशी वर्तमानपत्रांची कात्रणे जमा करून खूप काम झाल्याचा आभास निर्माण करतात आणि निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करतात तसाच प्रकार वैचारीक क्षेत्रात सुरू आहे. हे लोक ही असाच आभास  निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र परिणाम शुन्य असतो. कसूरी प्रकरणातही कुलकर्णी यांना पाकचे एजंट ठरवण्यात आले आहे. आणि घटनेनंतर कुलकर्णी यांनी जो काय सवंग प्रकार केला त्यावरून त्यांनाही माध्यमांचा वापर करून मोठा इम्पॅक्ट झाल्याचा अभास निर्माण करायचा होता असे दिसते.
   
समाजामध्ये सर्वबाजूनी विचार करण्याची क्षमता असणारे लोक संख्येने खूप कमी असतात. बहुतांश लोक फास्टफूडसारखी तयार मांडणी स्वीकारून  आपली मते बनवत असतात. असे लोक जगाकडे ब्लॅक अॅण्ड व्हाईट या रंगातच पाहतात. त्यांची स्वपक्ष आणि शत्रूपक्ष अशी सरळ विभागणी असते. त्यांच्यासमोर कोणताही  तर्क चालत नाही.  खरे तर असे सरळ ब्लॅक अॅण्ड व्हाईट असत नाही थोडा फार ग्रे एरीया पण असतो.  पाकीस्तानच्या बाबतीत तो कमी असेल पण असेल निश्चित. त्यालाही संधी द्यायला काय हरकत आहे.  वाजपेयी यांनी ही संधी दिली होती. पण त्यावेळी  शांती वार्ता सुरू असताना कारगिल घडले होते. तरीही सर्व पर्याय खुले ठेवूनही शांती प्रयास सुरू ठेवणे आवश्यक असते. पण हे समजणारा प्रगल्भ समाज निर्माण करण्यासाठी मूळापासून आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. पण ते न करता देशातल्या अनेक विचारवंतांनी  स्वीकारलेल्या राजकीय  तडका असलेल्या शार्टकटमूळे परिस्थिती अधिकच चिघळू शकते. मात्र ती चिघळावी हाच हेतू असेल, आणि तसा प्रयास करणाऱ्या विघातक शक्तींना विचारवंत आपला खांदा वापरायला देत असतील आणि त्यांना पुरक  मांडणी होत असेल तर ती या राडेबाजीपेक्षा भयंकर ठरेल..

Saturday, October 10, 2015

आणि मला वाढदिवस सापडला

 जन्मतारीख एक खोज 

आमच्या लहानपणी वाढदिवस साजरा करणे हा प्रकारच माहीत नव्हता. बऱ्यापैकी पैसे असणाऱ्यांकडे जाऊळाचे किंवा बारशांचे कार्यक्रम गावजेवण देऊन साजरे केले जात, पण अशी घरे मोजकीच असत. पण तेवढाच काय तो उत्सव,त्यापलिकडे जाऊन  दरवर्षी वाढदिवस साजरा केला जात नसे.   अख्या गावात कुणाचाच वाढदिवस नसल्याने त्याची कुणाला खंतही नसे. बरोबरच्या मुलांपैकी कुणालाच आपला वाढदिवस कधी याची आठवणही नसे.

पुढे कोल्हापूरला गेल्यावर बरेच लोक आपले वाढदिवस साजरे करतात आणि प्रत्येकाचा तो एक व्यक्तिगत  वार्षिक सण असतो हे कळले. ज्याचा वाढदिवस असेल त्याला पुष्पगुचच्छ देऊन शुभेच्छा देणे, केक कापणे, त्याच्या तोंडाला केक माखणे, मित्रासोबत हॉटेलात पार्टी करणे  असे प्रकार शहरात सर्रास सुरू झाले होते. बाकीचे खिशाला परवडणारे नसले तरी,  किमान चार लोकांना सांगता येईल असा अधिकृत असा आपलाही एक वाढदिवस असायला हवा असे वाटायला लागले. त्याआधी जन्मतारीख हा विषय तसा दूर्लक्षितच होता. शाळेच्या रजिस्टरवर आणि नंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यापुरते त्याचे अस्तित्व होते. ती शोधूल पाहिली तर ती होती एक सहा एकोणीसशे एकोणऐंशी. थोडा आणखी शोध घेतल्या नंतर कळले की गावच्या शाळेत माझ्या वर्गात नऊजण होते. त्या पैकी आठ जणांची जन्मतारीख हीच होती. त्याकाळी जास्तीत जास्त पाचशे ते सहाशे लोकसंख्येच्या आमच्या गावात एका दिवशी आठ मुले जन्माला येणे केवळ अश्यक्य होते. मग हा चमत्कार कसा झाला. तो चमत्कार केला होता आमच्या चिले नावाच्या गुरूजींनी. त्यांनी आपल्या लेखणींच्या एका फटकाऱ्यात हा चुकीचा इतिहास तयार केला होता. गावातल्या मुलांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या एकशिक्षकी शाळेचे ते कित्येक वर्षे एकमेव आधारस्तंभ होते. त्यांनी ही परंपरा अनेक वर्ष जोपासली त्यामुळे गावातली पहिल्यांदा शिकणारी सबंध पिढी एक जूनलाच जन्मल्याचे दस्तऐवज तयार झाले.

आता हा इतिहास पुसून खऱ्या इतिहास समोर आणणे गरजेचे होते, नव्हे ते आपले कर्तव्यच आहे. असे समजून त्या काळातले संदर्भ शोधायला सुरूवात केली. त्या काळात बाहेरच्या जगाची नुकतीच ओळख होत होतीथोरा मोठ्यांची चरीत्र आणि त्यांचे विचार वाचून आपणही असे काहीतरी भव्य काम करू असा विश्वास होता. कारण वयानुसार निरागसता आणि प्रचंड उमेद होती. आता बॅंकेचे हप्ते सुरू रहावेत म्हणून नोकरी टिकवण्याची कसरत करत राहणे या पलिकडे काही दिव्य काम झाले नाही तो  भाग वेगळा. पण त्या समजुतीतून चुकून काही लोकोत्तर काम हातून झालंच तर नंतर जन्मतारखेचा वाद नको म्हणून खरी जन्मतारीख आपणच शोधून ठेवलेली बरी म्हणूनही खरी जन्मतारीख शोधायला हवी होती. आता पस्तिशी गाठल्यानंतर आपली झेप कुठपर्यंत आहे हे कळून चुकलेय. काहीच नाही मिळाले की अनुभव नक्की मिळतो  असं म्हणतात. त्यामुळे आयुष्य  खूप अनुभव संपन्न झालेय.

तर मुद्दा असा की, खरी जन्मतारीख शोधण्याची मोहीम सुरू झाली. शाळेतून कळलं की, इथं सगळेच कष्टकरी, थोड्याफार शेतीशी आणि निसर्गाशी झगडणारे, मुलांच्या जन्माची नोंद करणे, जन्मदाखला काढणे असले काही त्यांच्या गावीही नसायचे. ही मुले जेव्हा शाळेत यायची त्यावेळी आजच्यासारखी जन्मदाखल्याची अट नव्हती. पण शाळेत घालण्याचे वय तरी पूर्ण व्हायला हवे. शाळा जून मध्ये सुरू होतात. म्हणून ज्यावर्षी मुलगा शाळेत येईल त्या पासून बरोबर सहा वर्षे मागे जावून त्या वर्षीची एक जून तारीख ही त्या मुलाची जन्म तारीख ठरवून ती त्याला कायमची चिकटवून टाकायची हा मार्ग मास्तरांनी अवलंबला होता. कारण पालकांकडे जन्मदाखला मागणे किंवा जन्म तारीख विचारण्याचा काय उपयोग नव्हता हे त्यांनी ओळखले होते, मुल शाळेत येणे हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. अशाच पंच्याऐंशीच्या बॅचमध्ये शाळेत गेल्याने मला एकोणऐंशीची एक जून ही जन्मतारीख मिळाली.

आता खरी तारीख कोणती हा प्रश्नच होता, आईला विचारल्यावर तिने तिच्या आमावस्या पोर्णिमेच्या कॅलेंडर नुसार, दसऱ्याच्या आमावस्येला माझा जन्म झाल्याचे सांगितले. पण साल कोणते हा प्रश्नच होता. त्यावेळी आईने सांगितले की माझ्या जन्मानंतर खऱ्या जन्म तारखेचा अनुषंगिक पुरावा मिळण्याची एक होती. ती म्हणजे आमच्या गावातल्या भटजीने जन्मवेळ पाहिल्यानंतर लिहून दिलेला कागद. पण तो कागद घरापर्यंत पोहचायच्या आधीच हरवला होता आणि पुन्हा तो काढायला सवड मिळाली नव्हती. त्यामुळे ही शक्यताही मावळली . मग त्यावर्षी गावात झालेल्या ठळक घडामोडींची जसे त्यावर्षी मरण पावलेली माणसे, झालेली लग्ने यांची संगती लावून 1980 हे साल मिळाले. मग तारीख कोणती. कोल्हापूरात मी गावातल्या मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होतो. तिथे शेजारच्या खोलीत एक पुरोहित राहत होता. सोलापूर भागातून आलेला हा माणूस सत्यनारायण सांगणे वगैरे काम करायचा जेव्हा काम नसेल त्यावेळी एक तर झोपायचा किंवा आमच्याशी गप्पा मारायचा. कुंडल्या तयार करून देणे हा ही त्याचा जोडधंदा होता हे नंतर कळले, त्याने माझी कुंडली करण्याचा आग्रह धरला ते ही कोणताही मोबदला न घेता. त्यावेळी त्याला माझी समस्या सांगितली. त्यावर्षीच्या दसऱ्याच्या आमावस्येला कोणती तारीख होती हे शोधून काढणे त्याच्या दृष्टीने बाये हात का खेल होता. त्याने तात्काळ त्याचे पंचांग पाहिले आणि ती तारीख नऊ आक्टोबर असल्याचे लगेचच सांगून टाकले. पण जन्माची वेळ निश्चित माहित नसल्याने त्याने अंदाजाने कुंडली तयार केली. मला साडेसाती असून कुठल्यातरी योगाची  शांती करावी लागेल असा उपाय सांगितला. अशा प्रकारे खरी जन्मतारीख मिळाली आणि मला साडेसाती लागली. साडेसातीवाल्यांचे एक बरे असते कठीण काळ कधी तरी संपणार अशी आशा तरी असते.  अर्थात मी पत्रकारीतेमध्ये येऊन ती आशाच संपवून टाकत ती भविष्यवाणी खोटी ठरवली.

पुढे आणखी एक समस्या होती दाेन तारखामध्ये तब्बल सतरा महिन्यांचा फरक होता आणि   या नव्याने शोधलेल्या  जन्म तारखेला सिद्ध करण्याचा कोणताही ठोस पुरावा माझ्याकडे नव्हता. त्यामुळे ती रीतसर बदलून घेता आली नाही. तरीही त्यानंतर कागदावर जूनीच जन्मतारीख ठेवून नवीन जन्मतारीख अनौपचारीकपणे वापरायला सुरूवात केली. मात्र गुरुजींनी चिकटवलेली एक जून कायमची पुसून टाकता नाही आली. त्या तारखेनुसार माझ्या जन्माच्या आधीच सतरा महिने रेकार्डवर मी अस्तित्वात होतो. त्यामुळे  माझी सरकारी नोकरीची पात्रता वेळे आधीच संपली आणि नोकरी करत राहिलो तर सतरा महिने आधीच रिटायर्ड होणार. म्हणतात गुरूजनांची माणसाच्या आयुष्यावर खुप खोलवर छाप असते. पण आमच्या गुरुजींनी जी छाप सो़डलीय तीला जगात दूसरी तोड नाहीे. त्यांनी दिलेली जन्मतारीख जी चिकटलीय ती कायमचीच. खरी जन्मतारीख शोधून मी काय मिळवले माहित नाही ती शोधणे आणि कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना ती बदलून मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारणे कितपत योग्य पण माहित नाही. पण मी गेले अनेक वर्षे ते करत आलोय.   त्यामुळे थोडासा अपराध भाव आहेच. पण आपली जन्मतारीख अशी मोघम नसली पाहिजे हा अट्टाहास मी पूर्ण करतोय.  आई वडिलांनी ठेवलेली नावे ओल्ड फॅशनची म्हणून जसे  दगडूचे रॉकी या चालीवर परस्पर नामांतर करणाऱ्या अनेकजणांना मी ओळखतो. त्या तुलनेत एक जूनची खोटी जन्मतारीख बदलण्याचा माझा गुन्हा म्हणजे खुपच सौम्य प्रकारातला आहे. 
 
कागदावर एक जूनच असल्याने एचआरच्या बर्थ डे मेलिंग लीस्टमध्ये माझा वाढदिवस एक जूनलाच असतो. सोशल मिडीयामुळे कळले की असे एक जूनवाले खूप लोक आहेत. त्यांनीही आपली खरी जन्मतारीख जरूर शोधावी. कारण नंतर नसते वाद नकोत. ऩुकत्याच झालेल्या वाढदिवसाला अपेक्षेपेक्षा जास्त मित्रांनी शुभेच्छा दिल्या. सोशल मिडीयाची कृपा दुसरे काय. आपल्या असण्याची दखल एवढे लोक घेतायत ही जगण्याची आसक्ती वाढवणारी आणि निराशा दूर करणारी बाब होती. शुभेच्छा स्वीकारताना अपराध भाव होता. एक तर आठवणीने सगळ्यांना शुभेच्छा देणे काही मला जमत नाही. त्यात हे  जन्मतारीख प्रकरण. हे तर आता क्लीयर झालेच आहे. य़ेणाऱ्या काळात सर्वांना आठवणीने शुभेच्छा द्यायच्या आहेत. बघूयात किती जमतेय.....