बिहारच्या निवडणुक रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार बिहार मध्ये लालू प्रसाद यादव सत्तेत आले तर जंगलराज दोन येईल असे सांगत होते. पण त्यांच्या प्रचाराचा उलटा परिणाम करून हा यादवांचा अपमान आहे हे लोकांच्या मनावर ठसवण्यात लालू प्रसाद यादव यशस्वी झाले आणि 243 पैकी 82 जागा जिंकून नितीश कुमार यांच्यासह सत्तेवर आले. त्यानंतर बिहारमधील कोणत्याही गुन्हेगारी घटनेला राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळू लागली. 24 तास बातम्या देणार्या वाहिन्यानी तर जंगल राजच्या टॅगलाईन आवर्जून लावल्या. लालूंनी आपल्या दोन्ही मुलांना मंत्री करून विरोधकांच्या हातात कोलीतच दिले. मग शपथ घेताना शब्द चुकल्यामुळे तेजस्वी यादव यांना नव्याने शपथ घ्यावी लागल्यामुळे झालेल्या नामुष्कीचीही राष्ट्रीय चर्चा झाली. लालूंनी केजरीवाल यांना मारलेली मिठीही राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. केजरीवाल यांनी स्वतःचा बचाव स्वतःच केला आहे. पण लालूंच्या मुलाचा बचाव करण्यासाठी समाज माध्यमामध्ये त्यांच्या समर्थनासाठी फौज च्या फौज उतरली आहे. त्यामुळेच तेजस्वी यादव यानी क्रिकेटसाठी शिक्षणाला रामराम ठोकून देशावर उपकार केल्याचे दाखले दिले जाऊ लागले. कमी शिकलेल्या किंवा अजिबात न शिकलेल्या यशस्वी राजकीय नेत्यांची नावे समाज माध्यमातून विरोधकांच्या तोंडावर भिरकावली जात आहेत. लालूप्रसाद यांनी तर पंतप्रधान मोदीही अठरा महिन्यांपूर्वी शपथ घेताना चुकल्याचा शोध लावत त्यांनी पुन्हा शपथ घ्यावी अशी सूचना केली आहे.
याआधी मोदींचा बचाव करणारी फौज समाज माध्यमांमध्ये आहे असे ऐकले होते. पण लालूंच्या 25 वर्षाच्या मुलाचे कार्यकर्ते रातोरात पूर्ण देशभरात तयार झाले हे एक नवीनच. हे कार्यकर्ते त्यांनी बिहारसाठी आणि देशासाठी काम करायला सुरूवात करण्या आधीच तयार झाले हे विशेष. देशभरात चाहते निर्माण करण्यास राजकारणात अनेकांना आयुष्य घालवावे लागले त्यामानाने लालूपुत्रांना खूप नशिबवान मानावे लागेल. घराणेशाहीला विरोध केला पाहिजे हा आदर्शवादी आग्रह सोडून देऊया पण 25 वर्षाच्या या तरूणामध्ये त्याच्या चाहत्यानी असे काय पाहिले की ते त्याच्या बचावसाठी ते सोशल मिडीयाच्या आखाड्यात उतरले . वडिलांची पुण्याई म्हणावी तर लालू यांना मिठी मारल्याबद्दल केजरीवाल ते जबरदस्तीने आपल्या गळ्यात पडल्याचे स्पष्टीकरण देत फिरत आहेत. मग असे काय कारण आहे की अनेकजण तेजस्वी यादवांचे समर्थन करत आहेत. की भाजप आणि मोदी यांना हरवले हीच गुणवत्ता बाकी काही केले तरी चालेल त्यांना काही बोलाल तर खबरदार तुम्हाला आम्ही नमोरुग्ण ठरवू हा इशारा यामागे आहे.
विरोधक आणि समर्थक अशा दोन बाजू या लढाईत आहेत. आधी विरोधकांचे काय म्हणणे आहे हे समजून घेतले पाहिजे. मोदी आणि भाजपचे नेते जो जंगलराज चा उल्लेख वारंवार करत होते ते खरोखरच तसं जंगलराज अवतरल्याचं सिद्घ करण्याची घाई मोदीभक्तानाही झाली आहे. कोणत्याही घटनेचा संबंध जंगलराजशी जोडून आम्ही म्हणत होतो ते कसे खरे ठरत आहे हे सांगण्याचा हा अट्टाहास आहे. लालूंची सत्ता म्हणजे जंगलराज आल्याचे सांगत त्याना निवडणार्या देणाऱ्या बिहारी जनतेला मुर्ख ठरवण्यासाठी हा आटापिटा आहे. वास्तविक पाहता निवडणुकीच्या आधी बिहारमध्ये सगळे काही आलबेल होते असे नाही. आकडे बघितल्यास बिहारमध्ये अगदी नितीशच्या काळातही रोजच्या रोज कायद्याचा खून पाडला जात असल्याचे लक्षात येईल. एका रात्रीत लोक बदलत नसतात. मग लालूंच्या सोबतीने नितीश यांची सत्ता आल्यानंतर काय बदलले, बदलले असले तर त्याच घटनांकडे बघण्याचा विरोधकांचा चष्मा.
नितीश आणि भाजप एकत्र असते तर कदाचित जंगलराजचा विषय एवढा चर्चिला गेला नसता. आधीच पूूर्वग्रह करून बसलेले विरोधक कोणतीही घटना जंगलराजशी जोडत आहेत ईतकेच. शपथ घेताना लालूपूत्राने अपेक्षितला उपेक्षित म्हणणे आणि राज्यपालांनी त्यांना परत शपथ घ्यायला लावणे हे तो मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम नसल्याचा मुद्दा ठसवण्यासाठी विरोधकांना उपयुक्त ठरले आहे. थोडक्यात काय की आम्ही जसे म्हणत होतो ते जसेच्या तसे होतेय, म्हणजे लालू नितीश यांना निवडून देणारी जनतेचे चुकलेच.वास्तविक बघता दोन्ही बाजूनी इतक्या लवकर निष्कर्षापर्यंत येणे योग्य नसते. जनमताचा कौल मोकळ्यामनाने स्वीकारणे प्रगल्भतेचे लक्षण असते. पण लोकशाहीत निवडून दिलेल्या सरकारला नालायक ठरवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून करत राहणे हे विरोधकाचे एक लोकशाही कर्तव्य बनले आहे असे दिसते. मग त्यासाठी मुद्दे हवेत, नसतील तर ते शोधायला किंवा तयार करायला हवेत किमान जे काही मुद्दे मिळतील ते घासूनपुसून अतिरंजित करून जनतेसमोर मांडत रहायला हवे, हे विरोधकासाठी अनिवार्य बनलेले आहे. त्यामध्ये खरे प्रश्न दूर्लक्षित राहत आहेत. प्रचंड पैसा वापरून जनसंज्ञापन शास्त्रातील विविध सिद्धांत वापरून लोकांना जे लोकशाही व्यवस्थेचा आधार आहेत त्यांना यामध्ये गिनिपिग करून गोंधळवून टाकले जात आहे. धंदेवाईक माध्यमे आणि काही विघातक शक्ती यातून हात धुवून घेत आहेत.
जसे भाजप लालू परत सत्तेवर आल्यावर बिहार खड्ड्यात जाईल, जंगलराज येईल असे सांगत होता. तसेच भाजप सत्तेवर आल्यानंतर देशात धार्मिक उन्माद वाढेल, अल्पसंख्यांक असुरक्षित होतील असे भाजपचे विरोधक सांगत होते. पण भाजपाने त्यांचा राममंदिर, संमान नागरी कायदा असा पारंपारीक एजंडा बासनात गुंडाळल्याने विरोधकांची मोठीच निराशा झाली. मग हे सरकार देश संभाळू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक घटनेकडे भिंगातून पाहणे सूरू झाले. त्यात दादरीची घटना सरकार विरोधात रान पेटवण्यासाठी अतिशय फिट केस म्हणून विरोधकांनी पुढे आणली आहे.
वास्तविक पाहता दादरीहून भीषण अशा घटना देशात याआधी घडल्या आहेत. पण त्यावेळी विरोधकांच्या मतानुसार फॅसिस्ट विचारांचे सरकार सत्तेत नव्हते. म्हणजे आपल्या विचारांचे सरकार असताना त्याच घटना तेवढ्या गंभीर नसतात जेवढ्या विरोधी विचारांचे सरकार असताना होतात. म्हणजे हत्याकांडे आणि दंगली ही समस्या नाही तर आपल्याला हवे ते सरकार सत्तेत नसणे ही समस्या आहे. मग आपल्या आधीचेच सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रान तापवले गेले. म्हणजे विरोधी विचारांचे सरकार सत्तेत असताना अराजक माजावे, अल्पसंख्यांक असुरक्षित व्हावेत किमान त्यांना तसे वाटून धृवीकरण व्हावे. याची वाट बघत विरोधीपक्ष आणि इतर शक्ती बसायला लागल्या आहेत. खरे तर सरकार आणि विरोधक यांचा देशाचे कल्याण हाच हेतू असला पाहिजे. पण तशी अपेक्षा करण्याचा काळ संपला आहे. दूर्दैवाने एखादी वाईट घटना घडलीच तर दुःख होण्याऐवजी ज्यांचे सरकार नसेल त्यांना आनंद होत आहे. ही लोकशाहीची नेमकी कोणती अवस्था असेल बरे...
No comments:
Post a Comment