Tuesday, November 24, 2015

तिची अशी हार… आपल्याला परवडेल ?

ब्लॉग सुरु करण्याआधी गेल्या एप्रिलमध्ये facebook वर टाकलेली पोस्त इथे पुन्हा टाकत आहे . देशात मुद्दाम घडवून आणलेल्या अनावश्यक चर्च्या खरे मुद्दे हरवले आहेत. जे खरोखर सहन करत आहेत त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाहीत. कारण त्यांना राजकारण कळत नाहि. आणि आपल्या दुः खाचे भांडवल करून सत्ताधार्यांना जेरीस आणणे त्यांना जमत नाहि.

ती किरण बेदी सारखी धडाकेबाज पोलिस अधिकारी होऊ शकली असती किंवा उद्याची दूर्गाशक्ती नागपाल. पण आता त्यापैकी काहीच होणे नाही. कारण तिनं नुकतीच बारावीची परीक्षा दिलीय आणि पुढच्या आठवड्यात तिचं लग्न आहे.परीक्षेचा निकाल येण्याआधी तिच्या करीयरचा हीपुरता निकाल लागलाय. अल्पभुधारक कोरडवाहू शेतकरी असलेल्या तिच्या बापाची तिच्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची, शेती परवडत नसल्याने शहरातल्या कारखान्यात12-12 तास राबण्याची तयारी होती. पण त्यानेही आता परिस्थितीपुढे हार मानलीय. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत तिचे हात पिवळे करायचेच असा चंग त्यान बांधलाय. असं काय झालंय की तिच्या सगळ्या कुटूंबाचीच सगळी स्वप्नच उद्ध्वस्त झालीत
दररोज पाच सहा किलोमीटरचा डोंगराळ रस्ता तुडवत तिनं 85 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी ती सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरली. एवढ्या गुणांचं  लोकांना काही कौतुक नसेल. पण कोणत्याही टयूशन क्लासेस शिवाय शिवाय दूर्गम भागातल्या मुलीनं एवढे गुण मिळवणं हे निश्चितच असामान्य असं यश होतं.
पुढच्या शिक्षणासाठी तिनं नातेवाईकांच्या आधारानं जिल्हयाचं ठिकाण गाठलं. इथून सुरू झाला तिचा अडथळ्याचा प्रवास. काॅलेज मध्ये जाता येता गावातल्या एका अर्धशिक्षित गावगुंडाने तिचा पिच्छा पुरवायला सुरूवात केली. तिला तिच्या ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट करण्याचे उद्योग सुरू झाले. आजूबाजूचं वातावरण एवढं दूषित की तक्रार करायचीही सोय नाही. आणि जर का केलीच तर हिलाच दोषी ठरवून कायमचं शिक्षण बंद होणार, याची तिला खात्री होती. मात्र या गोष्टी कानावर आल्यावर नातेवाईकांनीही हात झटकायला सुरूवात केली. त्यामुळे खरे तर अकरावीनंतरच शाळा सुटायची. पण तिनं आई बाबांना विश्वास दिला आणि फक्त बारावी पूर्ण करू देण्यासाठी परवानगी मिळवली. बारावीच्या वर्षातही तिला त्रास सुरूच राहिला. पण तिनं आता विरोध करायला सुरूवात केली आणि अभ्यासवर लक्ष केंद्रीत केलं
बारावीचा शेवटचा पेपर देऊन ती परीक्षा केंद्राबाहेर आली. आणि या गावगुंडाने तिला गाठले. आणि सरळ लग्नासाठी विचारले. तिनं नकार देताच त्यानं गंभीर परिणामांची धमकी दिली. तिला हे असह्य झाल्यानं धाडस करून वडिलांच्या कानावर घातले.आता मात्र तो बाप सैरभैर झाला कारण लग्न नाही लावून दिले तर पळवून नेण्याची भाषा सुरू झाली. किती पुढारलेला असला तरी माणुस अब्रूला भितोच. तो तर गावच्या वातावरणात वाढलेला तोही अस्वस्थ झाला. मग त्यान गुप्तपणे तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरूवात केली. अनेक बाबतीत तडजोडी करत शेवटी एक स्थळ निश्चित केले. अशा प्रकारे एका उज्वल भविष्याचा शेवट आणि तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला.
तिची कहानी ही एकमेव नाही. तिच्यासारख्या असंख्य ग्रामीण भागातल्या मुलींची हीच कहाणी आहे. आईच्या गर्भात असल्यापासूनच तिचा संघर्ष सुरू होतो. त्यातून वाचली तर पुढच्या कुठल्या तरी टप्प्यावर ती बळी पडते. आपण शहरातले लोक आणि सिनेमावाल्यांनी प्रेम संबंधांचे एवढे अवडंबर माजवून ठेवलेय की प्रेम करणे आणि ते प्राप्त करणे हेच आयुष्याचं सर्वोच्च ध्येय होऊन बसलंय. शहरी मध्यमवर्गीय कुटूंबात थोडी तरी सपोर्ट सिस्टीम असते. रस्त्यावर कायद्याचा थोडा तरी धाक असतो. पण या दोन्ही गोष्टींचा गावात संपूर्ण अभाव असतो. त्यामुळे रोमियोगिरीला खुली सुट मिळते. संख्या कमी असल्याने अर्धशिक्षीत गावगुंडांना लग्नासाठी मुलगी मिळणं कठीण असतं म्हणून त्याच्या घरचेही त्याला परस्पर प्रेमविवाह करण्यास एकप्रकारे प्रोत्साहनच देतात.
पण मुलीचा मनाचा तिच्या स्वप्नांचा कुणीच विचार करत नाही. तिची चुक असो किंवा नसो शिक्षा नेहमी तिलाच ठरलेली असते. त्यामुळे अनेक चांगल्या कॅलिबरच्या मुलींचं करियर याच वाटेने जातंय. गावातून शिकून करियर केलेल्या मुली किती आहेत याची माहिती गोळा  केल्यास आपला पुरोगामी बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून जिथे मुली शिकायला येतात त्या महाविद्यालयाच्या आजूबाजूला, एसटी बस स्थानकावर काय वातावरण असते. याचा धांडोळा घेतला तरी, आजच्या आधुनिक काळातही मुलीला शिक्षणासाठी किती अग्निदिव्य करावे लागते हे कळेल.
तिची अशी हार सर्वत्रच सुरु आहे, पण ती कुठपर्यंत चालू ठेवणार आहोत हा खरा प्रश्न आहे. अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आई वडिलांना शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. पण ते तसे का करतात याचा विचार कुणी केलाय का? मुलगी म्हणजे फार मोठी जबाबदारी असे आजही ते का मानतात. याचा मुळा पासून विचार केला पहिजे. रोगाचे मूळ कारण कायम ठेवून लक्षणावर इलाज करत बसण्याचे आतापर्यंत सुरु असलेले तर्कट इथे कामाला येणार नाही. 

सामाजिक आणि शास्त्रीय दृष्ट्या जबाबदार लैंगिक दृष्टीकोन संस्कार येऊ घातलेल्या भयानक सामाजिक संकटापासून वाचवू शकतील.लैंगिक निवडीच्या स्वातंत्र्याचा My Choice हिच आपली मुख्य प्रयोरीटी आहे असे मानणारया आणि तसल्या  स्त्रीमुक्तीचा उठता बसता उदघोष करणारयांच्या गावी हि जमिनी हकीकत आहे कि नाही काय महित? म्हणूनच स्त्री- सबलीकरणाच्या नुसत्या घोषणा देऊन भागणार नाही. त्या साठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही आपण घेतलीच पाहिजे.आपल्याला खरंच जर एक मजबूत समाज बनवायचा असेल तर हे चित्र बदललेच पाहिजे. अन्यथा बेटी बचाव आणि बेटी पढाव ही घोषणा घोषणाच राहील..

No comments: