मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम काल रवीश कुमार याना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले "मेक इन इंडिया आपण आता सुरु केलीय पण आसियान राष्ट्रांनी म्यन्युफॅक्चरिंग मध्ये तीस वर्षांपूर्वीच सुरुवात करून आघाडी घेतलीय. त्यावेळी ती गाडी आपल्याकडून सुटली, आणि आपण आता ती धावत जाऊन पकडायचा प्रयत्न करतोय." मग प्रश्न असा पडतो पूर्व आशियायी राष्ट्रे हे सगळे करत होती त्याकाळात भारत काय करत होता. देशाचे नेतृत्त्व कुणाकडे होते?. राजीव गांधींनी संगणक आणला म्हणून काँग्रेसी समर्थक त्यांचे कौतुक करताना थकत नाहीत. पण मॅनुफॅक्चरिंग मध्ये आपण कुठे आहोत. आज आपल्या देशाची औद्योगिक उत्पादनांची विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तूंची प्रचंड बाजारपेठ परदेशी कंपन्यांनी काबीज केली आहे. ती जर भारतीय कंपन्यांच्या ताब्यात असती तर आज "जॉबलेस डेव्हलपमेन्ट" म्हणून जी काही ओरड सुरु आहे ती झाली नसती. आशियायी राष्ट्रे जागतिकीकरणाचा लाभ उठवण्यासाठी सज्ज होत असताना आपण मंदिर मस्जिदीच्या वादामध्ये होरपळून निघत होतो. अडवाणींच्या नेतृत्वाखालील भाजपचे मंदिराचे राजकारण जितके या स्थितीला जबाबदार होते त्याहून अधिक राजीव गांधींचे अपरिपक्व नेतृत्त्व होते आपल्या देशात पक्ष कोणताही असो तो सत्तेसाठी तितकाच हपापलेला असतो. असे असताना काँग्रेसी नेतृत्वाने शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवून भाजपच्या हातात आयतेच कोलीत दिले आणि त्या चुकीचे परिमार्जन आणखी मोठी चूक करत राममंदिराच्या वाद चिघळवला, त्याची दुष्परिणाम देश आजही भोगतो आहे.
तैवान, सिंगापूर. कोरिया अशा छोट्या राष्ट्रांनी दूरदृष्टी ठेवून औद्योगिक उत्पादनात जी क्रांती केली तशी आपल्याला करता आली नाही त्याचे मूळ आपल्या देशातल्या कॉम्प्लेक्स राजकीय व्यवस्थेत आहे. अधिक स्पष्ट बोलायचे झाले तर आपली धेडगुजरी लोकशाहीही त्याला जबाबदार आहे. अनेक परस्परविरोधी गट एकावेळी इथे कार्यरत असतात आणि वेगवेगळ्या हितसंबंधी शक्ती त्यांना निंयंत्रित करत असतात. त्यामुळे अशी मोठी झेप घेण्यासाठी ज्या प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची गरज असते ती निर्माण होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यानंतर ती परिस्थिती थोडीशी बदलली आहे, पण आता खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे ती चुकलेली गाडी धावत जाऊन पकडताना सगळ्यांचीच दमछाक होणार आहे. त्याची प्रत्येकाला किंमत चुकवावी लागणार आहे. या प्रवासात धर्मा पाटील यांच्या सारखे अनेक बळी जाऊ शकतात. ती किंमत चुकवण्यास आपण तयार आहोत का हा प्रश्न आहे.
आपल्या देशात पर्यावरण संरक्षणाबाबत अतिशय अनास्था आहे. मॅनुफॅक्चरिंग मध्ये फोकस्ड असे काहीही न करता, जल, भूमी आणि पर्यावरणाचा आपण सत्यानाश केला आहे. रेगुलेशनमध्ये कोणतीही सुधारणा न करता मेक इन इंडिया यशश्वी झाला तर त्यानंतरची स्थिती अधिक भयावह असेल. आजच भारत मधुमेहाची जागतिक राजधानी झालाय. पर्यावरणाची काळजी नाही घेतली तर आपले अन्न पाणी आणि पर्यावरण एवढे प्रदूषित होईल कि, आपली मोठी लोकसंख्या व्याधिग्रस्त असेल आणि त्याचा भार उत्पादक लोकसंख्येला उचलावा लागेल, पर्यायाने आपल्या सकल राष्ट्रीय उत्पनातला मोठा भाग हेल्थकेअरवर खर्च करावा लागणार आहे.त्यामुळे आता मेक इन इंडिया सारख्या योजना बळाच्या जोरावर रेटण्यात काहीच हशील नाही. गेल्या ३० वर्षात पुलाखालून बरेच पाणी निघून गेले आहे. लोकसंख्या जवळपास दीडपटीने वाढली आहे जॉब मार्केट मध्ये कोट्यवधी लोक दररोज येत आहेत. आज नेतृत्त्वाचा बाबतीत भारत कधी नव्हे एवढा मजबूत स्थितीत आहे. त्याचा फायदा घेऊन भारताने मॅनुफॅक्चरिंगच्या मळलेल्या वाटेने न जाता बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारत आपला स्वतंत्र मार्ग चोखाळला पाहिजे. त्यामध्ये निसर्ग चक्रामध्ये कमीत कमी हस्तक्षेप करत निसर्गाशी तादाम्य साधत पुढे जाणारा गांधी मार्ग आपल्याच देशाला नव्हे तर जगाला मार्गदर्शक ठरू शकतो.
योग, आयुर्वेद, वैद्यकीय पर्यटन, निसर्ग शेती,सेवा क्षेत्र यामध्ये जागतिक दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करून देशाला मॅन्युफॅक्चरिंग हब करण्यापेक्षा सर्व्हिस सेकटरचे हब करणे अधिक फायद्याचे ठरणार आहे. बुद्धिजम या भारताचे सॉफ्टपॉवर ने एकेकाळी रक्ताचा एक थेंबही ना सांडता अर्धे जग जिंकले होते. त्याच धर्तीवर आपल्या सॉफ्टपॉवरचा वापर करून नवी वेव्ह निर्माण केली पाहिजे. आपले अतिरिक्त मनुष्यबळ, ब्रेन ड्रेन बद्दल रडत बसण्यापेक्षा जगाचं सेवाक्षेत्राची सूत्रे भारताने आपल्या हातात घेतली पाहिजेत. त्या दिशेने स्टार्ट-अप्स आणि इनोवेशनवर भर दिला पाहिजे. मोठी इन्व्हेस्टमेंट न करता मोठा प्रभाव निर्माण करणारे मार्ग निवडले पाहिजेत. ग्लोबलाझेशनचा बळी होण्यापेक्षा त्याचा लाभ उठवला पाहिजे.
लोकसंख्या नियंत्रण करतानाच पर्यावरणाचा कमीत कमी विनाश घडवणाऱ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. भरपूर उत्पादन देणाऱ्या पण कमी पोषणमूल्य असणाऱ्या शेती उत्पादन पद्धतीपासून हळू हळू फारकत घेतली पाहिजे, क्वांटिटी वरचा भर कमी करून क्वालिटीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी वाढवून ठेवलेली भूक, जी केवळ व्याधी आणि विष तयार करते ती कमी केली पाहिजे. उदाहरण द्यायचे झाले तर दूध उत्पादनाचे देता येईल. जगाच्या पावलावर पाऊल ठेवत आपण आपल्या देशात धवल क्रांती केली. पण सध्या आपल्या दूध उत्पादक संघांकडे हजारो टन दूध पावडर अतिरिक्त आहे. जगाच्या बाजारात आपल्या दूध पावडर पेक्षा स्वस्त पावडर उपलब्ध आहे कारण तिथला उत्पादन खर्च कमी आहे, पर्यायाने आपल्या मालाला उठाव नाही, त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात आपली केवळ दमछाकच होणार आहे.
हरितक्रांतीचे आणि जलवायुपरिवर्तनाचे दुष्परिणाम येत्या काळात अधिक ठळकपणे जाणवणार आहेत. हरितक्रांतीने दिलेल्या नव्या उत्पादन पद्धतीच्या वाढीव उत्पादनाचा भर ओसरायला सुरुवात झाली आहे. हजारो वर्षे सतत उत्पादन देणाऱ्या जमिनी ३०-४० वर्षात रसायनांच्या अधिकच्या वापरामुळे अनुत्पादक होऊ लागल्या आहेत. त्यामुळेच भारताने हार्डवेअर निर्मितीचा अट्टाहास सोडून देऊन आपल्या सॉफ्टपॉवरचा वापर करून जगात दबदबा निर्माण केला पाहिजे. योग, आयुर्वेद, या आपल्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करत पाश्चात्य देशात मोठी इंडस्ट्री निर्माण झाली आहे, त्यामध्ये भारतीय वरचष्मा कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत औद्योगिक समाजात निर्माण झालेले शारीरिक आणि मानसिक विकृती दूर करण्यासाठी अशा पर्यायी मार्गांची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे . तसेच रसायने आणि कीटकनाशकांचे अवशेषविरहित अन्न उत्पादनांना चढ्या दराने मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची उत्पादने बाजारात आणण्यासाठी दूरगामी दृष्टी ठेवून कार्यक्षम व्यवस्था निर्माण करण्यावर भारताने भर दिला पाहिजे. हे करत असताना गांधींनी सांगितलेला निसर्गाशी संतुलन साधणारा विचारच मार्गदर्शक ठरू शकेल
No comments:
Post a Comment