Thursday, September 17, 2015

चांगले अतिरेकी वाइट अतिरेकी


 राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता  राज्याच्या गृह विभागाने ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात सनातन संस्थेच्या एकाला अटक केली. सरकार  सनातनच्या विचारसरणीचे सहानुभूतीदार असल्याने गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असताना, प्रचलित धारणांना छेद देत  दाखवलेले हे धाडस निश्चितच अभिनंदनीय आहे. लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असणे काही गैर नसते. पण वैचारिक विरोधकाला संपवून टाकण्याच्या प्रवृत्तीला समाजात कोणतेही स्थान  असणार नाही, आणि  सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असा संदेश  यातून  दिला गेला आहे. या अटकेमुळे सरकारला एका छोट्या  गटाचा रोष ओढवून घ्यावा लागेल, पण त्यांची पर्वा करण्याची गरज नाही, कारण बहुसंख्य  समाज धार्मिक  असला तरी तो धर्मांध नाही. आरोपीला गुन्ह्यात जाणीवपूर्वक  फसवले गेल्याची ओरड काहींनी सुरु केली आहे. पण त्यातही काही नवीन नाही कारण आजकाल ती फॅशनच झाली आहे.

आपल्या देशात दहशतवादाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर बुद्धीभेद करून गोंधळ माजवण्याचे उद्योग गेली अनेक वर्षे सुरु आहेत . विघातक हेतूने संपूर्ण समाजाचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे  हे प्रयत्न वेळीच ओळखून त्याला पायबंद घालण्याची गरज होती. पण तसे न झाल्याने जनमानस कमालीचे  गढूळ  झाले आहे.  लोकानां खरे काय आणि खोटे काय हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे  तटस्थ आणि वस्तुनिष्ठपणे पाहिलेच  जात नाही.   गेली  काही वर्षे राष्ट्रीय सुरक्षेच्या अतिशय संवेदनशील  विषयाचे तत्कालिक फायदे डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केले गेले . त्यापुढे जाऊन काही हितसंबंधी गटांनी सुरक्षा यंत्रणाना आरोपीच्या पिंजरयात  उभे करण्याचे घातक खेळही  केले. म्हणूनच पानसरे खून प्रकरणी झालेली अटक संशय दूर करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल मानले पाहिजे.

 गेल्या  काही वर्षात देशभरातल्या मोठ्या शहरात लागोपाठ बॉंम्बस्फोट  झाले. अनेक हल्ल्यामध्ये  संशयित म्हणून एका  समाजातील युवकांना पकडण्यात आले. हे प्रकार जसजसे वाढत गेले तसे विशिष्ठ समाजाला टार्गेट केले जात असल्याची ओरड करायला काहिनी सुरुवात केली.  काही मेनस्ट्रीम राजकीय पक्षांनीही त्या सूरात सूर मिसळला.  हीच  ध्रुविकरणाची खरी सुरुवात होती. समतोल साधण्याच्या प्रयत्नात मग दहशतवादाला रंग द्यायला सुरुवात झाली. दहशतवादाला  असा रंग देणे अतिरेकी विचारांच्या पथ्यावर पडत असते  पण  आपल्याकडे नेमके तेच झाले. त्यामुळे  दहशतवादी गटांना आपले सहानुभूतीदार वाढवण्याची संधी मिळाली आणि एक दुष्टचक्र  सुरु झाले.

अतिरेक्यांच्या सुदैवाने आणि देशाच्या दुर्दैवाने अशाच धारणा घेऊन देशातील अनेक  बुद्धीमन्त  वावरत असतात.  विचारवंत, सामान्य जनता आणि राज्यकर्ते यांना असल्या  नसत्या वादात अडकवून दहशतवादी आपल्या कारवाया आधीपेक्षा दुप्पट वेगाने सुरु करु शकतात  कारण त्यांच्यासाठी कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. या  संघटना नवनवे षड्यंत्र सिद्धांत मांडतात आणि आपल्या एजंटामार्फत  समाजात पसरवण्याचे काम करतात. त्यानाच टार्गेट केले जात असल्याची भावना  विशिष्ठ समाजाच्या मनावर बिंबवत राहून अख्या समाजाला या चक्रात खेचण्याचा प्रयत्न होतो. तो बर्यापैकी यशस्वी होतानाही दिसतो. त्याचा उलट परिणाम म्हणून दुसरा समाज असुरक्षित होतो आणि विरुद्ध बाजूने ध्रुवीकरण होते. त्यांच्या मधील अतिरेकी लोकांना पाठींबा वाढत जातो.

बॉम्बस्फोट  झाली की,  विनाविलंब संशयितांचे नाव जाहीर  करणे जितके घातक असते  त्याहून विशिष्ट समाजातला कुणीच यात सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र विनाचौकशी देणेही  अधिक  घातक असते. असे केल्याने अतिरेकी शांतताप्रिय सामान्य लोकांचा ढालीसारखा उपयोग आपल्या कारवायांसाठी करतात.  सध्याच्या दूषित वातावरणात अतिरेकी वृत्ती सगळ्याच समाजात काही प्रमाणात असणार हे पहिल्यांदा मान्य करणे गरजेचे आहे . सतत नाकारत राहून दुसर्यावर कारस्थानांचा आरोप केल्याने  प्रश्न सुटत नसतात ते चिघळत जातात. दहशतवादाच्या बाबतीत आपल्याकडे  नेमके तेच झाले आहे. 

आपल्याकडे काय होते, हल्ला झाला की  ठराविक संघटनांची नावे पुढे येतात. त्यांचे पाठीराखे दुसर्या धर्माच्या संघटनावर  अल्पसंख्य समाजाला बदनाम करण्यासाठी कारस्थान करत असल्याचा आरोप करतात. पोलिसांनी जर कुणाला ताब्यात घेतले  तर विनाविलंब पोलिसांवर पक्षपाताचा आरोप सुरु होतो. तपास होऊन   न्यायालयाने जर शिक्षा दिलीच तर त्यावरही प्रश्न चिन्ह  निर्माण केले जाते .  असा एकंदरीत गोंधळ निर्माण केल्याने सुरक्षा यंत्राणाना  काम करणे अवघड होउन बसते.   काही बुद्धीवंत   नसते युक्तिवाद करून संशयात भर टाकण्याचे काम करतात.  अल्पसंख्य समाजामध्ये वेगळेपणाची भावना निर्माण करणे आणि स्थानिकांचा जास्तीत जास्त पाठींबा मिळवणे हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा हेतू असतो. मात्र  त्यांच्या पथ्यावर पडणाऱ्या भूमिका आपल्यापैकी काहीजण न कळत तर काहीजण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या धोरणातून घेत असतात. 

आपले ते सगळे चांगले आणि दुसर्याचे ते सगळे वाईट या वृत्तीतून दहशतवाद वाढत असतो. दुसर्याला चूक आणि स्वतः ला  बरोबर ठरवण्यासाठी  ते कोणत्याही थराला  जातात. कारवाया तर करायच्या पण सतत नाकारत राहायचे, अधून मधून वेगळ्या मार्गाने समर्थन करत रहायचे.  विक्टीम कार्ड खेळायचे. सरकारमध्ये, माध्यमांमध्ये, विचारवंता मध्ये सहानुभूतीदार मिळवायचे. लोकशाहीत जनमताला महत्त्व असल्याने लोकाना कन्फ्युज करायचे ही दहशतवादी कार्यपद्धती आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला insiders job असल्याची काॅन्स्पिरन्सी थिअरि मांडत  राहणे, किंवा भारतातल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय गुप्तचर यंत्रणाचा हात आहे असा प्रचार करत राहणे हा याच  कार्यपद्धतीचा भाग आहे. अशा थिअरि सुरुवातीला हास्यास्पद वाटतात. पण त्या सतत मांडत राहिल्याने काही लोकांना त्या पटू लागतात. हळूहळू  अशा लोकांची  संख्या वाढत जाते. आणि विघातक शक्तींचे प्लॅन यशस्वी होतात . याकुब मेमनच्या अंतयात्रेला  जमलेल्या  गर्दीकडे या पार्श्वभूमीवर बघितले पाहिजे.  कारण त्याच्यावरचे आरोप  सर्व कायदेशीर प्रक्रिया  प्रदीर्घ काळ राबवल्यानंतर शाबित झालेले होते. 

  पोलिस आणि  सुरक्षा दलातल्या त्रुटी  दूर करून त्यांना मजबूत करणे, सर्व समाजघटकामध्ये त्यांच्याबद्दल  विश्वास निर्माण करणे यासाठी काम करण्याची गरज आहे. एकदा पोलिसांनी अटक केली कि त्यामध्ये शंका घ्यायला  जागाच राहू नये अशी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. पण  कितीही फुलप्रूफ व्यवस्था असली तरी हेत्वारोप करणारे  काहीजण असणारच त्यामुळे  पोलिस आणि सुरक्षादलाचे मनोध्येर्य खच्ची  करणारयांना पायबंद घालणेही  तितकेच  महत्वाचे आहे.   पानसरे प्रकरणात अटक झालेल्या आरोपीला पोलिसांनी अकारण फसवले असे म्हणणार्यांना लोकांनी  फारसे  महत्व दिले नाही.  खुनाचा तपास लागावा म्हणून आंदोलन करणाऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे सनातनचाच  कार्यकर्ता पकडला गेल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पण दुसर्याच  कुणाला पकडले गेले असते तर दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आता आल्या तशाच आल्या असत्या का? पोलिसांवर एका बाजूने असाच अविश्वास आणि दुसर्या बाजूने असाच विश्वास व्यक्त झाला असता का ?  या प्रश्नाचे  उत्तर काय आहे यावरून आपण पक्षपाती आहे कि निपक्षपाती हे ठरणार आहे.  कारण आपल्याला सोयीचा निष्कर्ष निघाले कि पोलिस आणि न्यायालये निपक्षपाती आणि विरोधात गेले की पक्षपाती अशी ओरड करायचा आपण पायंडाच पाडला आहे.   


No comments: