ही गर्दी उत्स्फूर्त वाटत असली तरी त्याच्यामागे निश्चित असा एक पॅटर्न आहे. प्रगत देशात विकसित झालेल्या अत्याधुनिक संज्ञापन सिद्धांताचा आणि अत्याधूनिकी संपर्क साधनांचा प्रभावी वापर करून लोकांना भ्रमित करण्याचा हा प्रकार वाटतोय. . काहीतरी भयंकर शिजतेय आणि ते कुणाच्याच फारसे हिताचे नाही. अरब स्प्रिंग उठावासारखी परिस्थिती निर्माण केली जातेय . राज्यातला कुठलाही राजकीय पक्ष यामागे असेल असे वाटत नाही. फक्त प्रत्येकजण एकतर गर्दीचा रोष आपल्याकडे वळू नये यासाठी प्रयत्न करतोय किंवा त्याचा जमला तर राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय. नेमके काय सुरु आहे, याचा अंदाजच न आल्याने अनेकजण भांबावून गेले आहेत. पण याचे पडद्यामागचे सूत्रधार कुणीतरी वेगळेच असतील अशी शंका घ्यायला जागा आहे. कुणीतरी तिसरेच याची स्क्रिप्ट लिहीत असून त्याची अतिशय काटेकोर अंमलबजावणी होताना दिसतेय.
भारतासारखे प्रचंड विविधता असलेल्या देशात जातीय अस्मितांना टोके काढून लोकांना रस्त्यावर आणणे आणि विकासाला खो घालणे हा यामागे प्रमुख उद्देश असू शकतो. प्रत्येक जातीत, धर्मात काही विकृत घटक असतात पण त्याचे जनरलाइजेशन करून एका समाज घटकाला दुसऱ्या समाज घटका विरोधात उभे करण्यासाठी अतिशय पोषक वातावरण आपल्या समाजात आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आणि राजकीय धुरिणांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. रस्त्यावर कुणीही येवोत उच्च जातीचे येवोत किंवा परिघावरचे येवोत परिणाम तोच साधला जात असतो. कारण हे जे कुणी सूत्रधार असतात त्यांना फक्त हंगामा निर्माण करून आपला कार्यभाग साधायचा असतो . तुमचे आमचे जीवन मरणाचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना काहीच इन्टेरेस्ट असत नाही. आपण एकमेकांच्या उरावर बसावे आणि परिस्थिती अधिक चिघळावी यासाठीच ते झटत असतात. प्रस्थापित जातींना रस्त्यावर यायला भाग पाडणे हि तुलनेने कमी खर्चिक बाब आहे. कारण खर्च करण्याची त्यांची तयारी आणि क्षमता असते. गरीब लोकांची मोठी आंदोलने उभी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. म्हणून प्रस्थापितांना भडकावून रस्त्यावर आणले जात आहे.
अण्णा आंदोलन ज्या प्रमाणे प्रायोजित होते तसे जातीय आंदोलने प्रायोजित आहेत असा संशय घ्यायला जागा आहे. पण त्यावर कुणीही बोलत नाही. कारण गर्दीला अंगावर कोण घेणार हा प्रश्न आहे. गर्दी सहभागी होणार्यां ९९ टक्के लोकांना नेमके काय चाललेय याची कल्पना नसते. कारण वेगवेगळी Passion निर्माण करून सारासार विचार करण्याची क्षमता मारून टाकली जाते. जेव्हां आंदोलनाचा धुरळा बसतो तेंव्हा अनेकांना आपण वापरले गेलोत याची कल्पना येते पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो आणि व्हायचे ते डॅमेज होऊन गेलेले असते. त्यावेळी आंदोलनापासून फारकत घेऊन उपयोग नसतो. अण्णा आंदोलनाच्या वेळी लोकांचा भ्रष्टाचाराविरुद्धचा राग होता त्याचा खुबीने वापर केला होता. पण खरेच भ्रष्टाचार संपवणे हा त्या आंदोलनाचा उद्देश होता का या बद्दल शंका आहे. खुद्द आण्णा हजारे यांनाही कळले नाही कि आपल्याला कुणीतरी वापरून घेतले. आंदोलनासाठी एक बुजुर्ग गांधीवादी चेहरा हवा होता म्हणून . .तथाकथित क्रांतीच्या ओढीने अनेक प्रामाणिक लोकही यात ओढले गेले होते. वेगवेगळी गाजरे दाखवून वेग वेगळे उद्देश असलेल्या लोकांना फक्त एकत्र करून गर्दी जमवण्याचे एक तंत्र अण्णा आंदोलनात देशाने पहिले. तीच अरब स्प्रिंग टेकनॉलॉजि सध्याच्या आंदोलनातही वापरली जात असल्याची शक्यता आहे. . आंदोलनाचा मोठा देखावा निर्माण करणे आणि त्यातून आपले अंतस्थ हेतू साध्य करून घेणे असा या आंदोलनाचा हेतू असतो. या ज्या कुणी शक्ती असतात त्यांना नको असलेली राजकीय परिस्थिती बदलून टाकणे. अप्रिय सरकारे उलथून टाकणे. लोकांची दिशाभूल करून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कृत्रिम असंतोष निर्माण करून त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम साधने असे उद्देश असतात. एवढ्या प्रचंड संख्येने लोक असंतुष्ट आहेत याचा अर्थ इथली परिस्थिती स्फोटक आहे. त्यामुळे उद्योगांना आणि गुंतवणुकीला पोषक नाही हा संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर देणे हे आणि या पेक्षा विघातक हेतू यामध्ये असू शकतात. मग विकास रोखला कि रोजगार निर्मिती थांबते आणि परिस्थिती अधिकच स्फोटक बनत असते. मग ज्या कारणासाठी आंदोलने उभी केली जातात त्या उद्देशापासून आपण आणखी दूर फेकले जात असतो.
आपल्या लोकांना कळत नाही कि आपलीच ताकद आपल्या सर्वनाशासाठी कशी वापरली जात आहे. प्रश्न नक्की आहेत ते सोडवलेही पाहिजेत. न सोडवणाऱ्या सरकारनं जाब विचारला पाहिजे तो मत पेटीतून. पण लोकांना घायकुतीला आणायला लावणारी परिस्थिती कोण निर्माण करतेय. याची स्क्रिप्ट कोण लिहितेय याचा शोध घेतला पाहिजे.मास हिस्टेरिया निर्माण करून काय साधायचे आहे. आज परिस्थिती इतकी स्फोटक बनलीय कि लोक ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. गर्दी समोर शहाणपण चालेनासे झाले आहे. कुठलाही तर्क करायला गेला कि तुम्हाला लगेच शत्रू पक्षात ढकलले जातेय.केवळ राजकीय लाभाचा विचार न करता सर्व पक्षातल्या, सर्व समाजातल्या धुरिणांनी एकत्र येऊन याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
No comments:
Post a Comment