तीन महिन्यांपूर्वी जेंव्हा श्रीपाल सबनीस यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. कोण हे सबनीस ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. कारण मराठवाड्यातले सबनीस पुण्यामुंबईच्या साहित्य वर्तुळात फारसे कोणाला माहितच नव्हते. त्यामुळे त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड म्हणजे सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का होता. पण, अलीकडच्या काळात साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचे राजकारण प्रत्यक्ष राजकारणापेक्षा भयानक झाले आहे. जो या राजकारणात सरस ठरतो तोच निवडून येतो, म्हणूनच सबनीस हे या पदावर निवडूण आले असावेत असे म्हणावे लागेल. सबनीसांचे साहित्यिक कर्तृत्व काय? असा प्रश्न त्यामुळेच विचारला जाऊ लागला .
निवड झाल्या नंतर त्यानी मराठीतील मोठ्या विद्वांनांनी त्यांच्या लेखनाविषयी काढलेल्या गौरवोद्गारांचा सोशल मिडियाद्वारे प्रसार करत मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला. य. दि फडके, श्रीराम लागू यांच्यासारखे दिग्गज त्यांच्या लेखनाबद्दल चार चांगले शब्द बोलतात म्हणजे माणूस ताकदीचा असावा,असे माझ्यासारख्याना वाटले. पण मराठवाड्यातील असल्यामुळे कदाचित दूर्लक्षित राहिला असण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना संशयाचा फायदा द्यायला अनेकजण तयार झाले. किस्त्रीमच्या दिवाळी अंकात सबनीस यांनी लिहलेल्या लेखात मोदी कट्टरतावादाकडून उदारमतवादाकडे चालले आहेत अशी मांडणी केली. या लेखामुळे सबनीसांच्या विचारांची दिशा स्पष्ट होते. कोणत्याही विचारांतील मतभेदांचे मुद्दे बाजूला सारून समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे, त्यातच सगळ्यांचे हीत आहे. असा विचार मांडताना ते दिसले यावेळी ही लोक सोशल मिडीयावरून त्यांची टर उडवत होते, पण हा माणूस काही तरी वेगळे मांडतोय असे चित्र त्यांनी केले. राजकीय अस्पृश्येतेच्या भिंती बाजूला सारून विरोधी विचारांना ही समजून घेण्याचा प्रयत्न करणे यात काही गैर नव्हते, विचारसरणींचे मठ निर्माण करून आपल्याशी मतभेद असणार्यांकडे तुच्छतेने पाहणार्यांना सबनीसांची मांडणी उत्तर असू शकते असेही काहीना वाटले.
पण त्यानंतर सबनीसांनी वाद ओढवून घेण्याचा सपाटाच लावला. मोदींच्या बाजूने सकारात्मक मांडणी केल्यामुळे त्यांना वैचारिकदृष्ट्या बहिष्कृत होण्याची भिती वाटलेली दिसते. कदाचित म्हणूनच त्यानंतर वैचारीक कसरत करताना त्यांच्या बोलण्यामध्ये सातत्य दिसले नाही. कधी ते असहिष्णूतेचा बागुलबुवा उभा करणार्या अवार्ड वापसी गँगला पाठींबा देताना दिसतात, तर कधी मोदींना पंचशील तत्त्वाचे पुरस्कर्ते मानतात. अचानक मिळालेल्या प्रसिध्दीमुळे त्याची सवय नसलेले सबनीस वाहवत गेल्यासारखे वाटतात.
त्यानंतरच्या प्रत्येक भाषणामध्ये काहीतरी वादग्रस्त मुद्दा उपस्थित करुन मथळे मिळवण्याची धडपड हा माणूस करतोय की काय असे वाटू लागले. नुकत्याच आकुर्डी येथे झालेल्या युवा साहित्य संमेलनामध्ये त्यांनी मोदींबाबत केलेले वक्तव्य या सगळ्यावर कडी करणारे ठरले. वास्तविक पाहता नरेंद्र मोदींबाबत सबनीसांचे धोरण मवाळ दिसते. मोदी आता पूर्वीचे राहिले नाहीत हा त्यांचा थिसीस आहे. गुजरात दंगली वेळचे मोदी आणि आत्ताचे मोदी यामध्ये फरक आहे. आत्ता मोदी गांधी आणि बुध्दाची भाषा बोलत आहेत असे त्यांना म्हणायचे होते. पण तो थिसीस पटवून देण्यासाठी त्यांनी जी काही भाषा वापरली त्यावरून एकंदर साहित्य आणि साहित्यिक यांच्यापासूनच लोकांनी दूर राहणे पसंत करावे. आपला मुद्दा पटवण्यासाठी त्यांनी जो काही द्रविडी प्राणायाम करायचा प्रयत्न केला त्यात ते पुरते अडकले आहेत.
गुजरातचे मोदी माझ्यासाठी कलंकीत आहेत असे बोलताना त्यांचा पाकीस्तान दौरा म्हणजे मरायचे लक्षण होते. त्यांच्यावर हल्ला होऊ शकला असता आणि मंगेश पा़डगावकरांच्याआधी आपल्याला मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती असे ते बोलुन गेले आणि अपेक्षेप्रमाणे एकच गदारोळ उठला. वाद ओढवून घेऊन प्रसिध्दी मिळवण्याच्या नादात सबनीस न घर का ना घाट का असे झाल्याचे दिसते. सबनीसांचा माध्यमांशी संबंध गेल्या दोन तीन महिन्यातीलच आहे. प्रसिध्दी कशी काम करते हे त्यांना नव्यानेच कळले असावे, वाद निर्माण करुन नामानिराळे राहण्याचा त्यांना हातखंड़ा असणारे लोक निदान कोणती तरी बाजू घेताना आपल्या बाजूने काही लोक राहतील अशी व्यावहारिक दक्षता घेतात. पण या प्रांतात नवखे असलेले सबनीस गोंधळून गेलेले दिसतात. त्यांच्या नंतरच्या वक्तव्यावरून सबनीस नेमके कुठल्या बाजूला आहेत हेच कळत नाही त्यामुळे सबनीसांच्या बचावासाठी सोशल मिडियामध्ये कुठलीही फौज उतरणार नाही हे उघड आहे. त्यामुळे सबनीसांचे हे वागणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण होण्याचीच चिन्हे आहेत.
सबनीसांचे सध्याचे वागणे तरी हुरळली मेंढी या म्हणीची आठवण करून देणारे आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेपासून पिंपरी चिंचवडमध्ये होणारे चार दिवसाचे साहित्य संमेलन एकंदरीत वादग्रस्त होण्याची चिन्हे आहेत. वाद ओढवून घेऊन संमेलनाची आणि स्वतःची प्रसिद्घी करण्याचा सबनीस यांचा डाव असेल तर ते त्यात यशस्वी झाले आहेत. पण काही वेळेला स्थिती आपल्या नियंत्रणात राहत नाही, याचे सबनीस आणि संमेलनाच्या आयोजकांनी भान ठेवलेले बरे...
No comments:
Post a Comment